धुळे येथे दुचाकीच्या डिक्कीतून पावणेचार लाखाची रोकड लांबविणाऱ्या दोघांना अमळनेरात घेतले ताब्यात

Thursday, September 30, 2021

/ by Amalner Headlines
दोन्ही आरोपी जळगाव येथील, पोलिसांशी झाली झटापट

अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल

अमळनेर - धुळे येथे दुचाकीच्या डिक्कीतून पावणे चार लाख रुपये लंपास करून पळ काढणा-या जळगाव येथील दोन सराईत गुन्हेगारांना अमळनेर येथे अटक करण्यात आली आहे. यावेळी सदर आरोपींची पोलिसांशी झटापट झाली. दोन्ही आरोपींवर अमळनेर पोलीस स्टेशनला सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी झाली कारवाई
याबाबतची अधिक माहिती अशी की,पोलीस नाईक दिपक माळी व रवींद्र पाटील हे दि. २९ रोजी शहरात गस्त घालत होते. त्याच वेळी सायंकाळी ६ वाजता पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना दि. २१ रोजी धुळे येथील बांधकाम भवनच्या आवारातून मोटारसायकलच्या डिक्कीचे कुलूप तोडून त्यातून ३ लाख ८० हजार रुपये चोरणारे दोघे जण अमळनेरात आले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. धुळे येथील घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. त्यानुसार पो.नि.जयपाल हिरे यांनी गस्तीवरील पोलिसांना सदर आरोपींना ताब्यात घेण्यास सांगितले. शहरातील बसस्थानक भागात तपास करत असतांना जळगाव येथील तांबापुरा कंजरवाडा भागातील सराईत गुन्हेगार अजय बिरजू गारुंगे (वय ३०) व हितेश कृष्णा शिंदे (वय २१, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे दोघे मोटारसायकल (क्रमांक एमएच- १९-सीटी-५३१२) वर येत असतांना दिसून आले. पोलीसांनी दोघांना अडवले असता त्यांनी पोलिसांना ढकलून खाली पाडले. तरीही पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ओढाताण करून शर्टाची कॉलर पकडली व झटापट केली. या झटापटीत पोलिसाच्या शर्टाचा खिसा फाटला. त्याच वेळी बसस्थानकावर कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद महाजन व ज्ञानेश्वर भोई हे घटनास्थळी पोहोचले. पोलीसांनी दोन्ही आरोपींना पकडून पोलीस स्टेशनला आणले.
आरोपींविरूध्द गुन्हा दाखल
यातील एक आरोपी अजय विरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पो.ना. रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी हे करत आहेत.
अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता - पो.नि. जयपाल हिरे
पोलिसांनी तपासणी केली असता आरोपींकडे मोटार सायकलच्या डिक्कीचे लॉक तोडण्याची मास्टर की जप्त करण्यात आली आहे. आरोपींकडून अजूनही अनेक गुन्हे उघडकीस येऊ शकतात अशी शक्यता अमळनेरचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी व्यक्त केली आहे.
-------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines