आम्ही मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाहीत- खासदार स्मिता वाघ कडाडल्या




साहेबरावांचा गेम कोणी करू शकणार नाहीत पण साहेबराव कोणाचा गेम करतील सांगता येत नाही- मंत्री अनिल पाटील

 *अमळनेर* - विधानसभा मतदार संघात जातीपातीचे राजकारण केले जात आहे. मला धमक्या येत आहेत. आम्ही मेलेल्या आईचे दूध प्यालेलो नाही हिंमत असेल तर समोर येऊन धमक्या द्या. माझ्यापुढे हजारो कार्यकर्ते उभे राहतील अशा कडक शब्दात खासदार स्मिता वाघ यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
      महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनामा प्रकाशन प्रसंगी खासदार स्मिताताई वाघ पत्रकार व कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या. गत काळातील घटना अथवा वक्तव्य व्हायरल करून महायुतीत गैरसमज निर्माण करण्याचे काम विरोधक करीत आहेत. बोलायला संस्कृती, मर्यादा असली पाहिजे पाच वर्षापूर्वीची परिस्थिती आता नकोय, हातगाड्यांवर दारू मिळायची ६० तरुणांचा बळी गेलाय.औद्योगिक दृष्ट्या मोठी एमआयडीसी असावी आणि त्यासाठी लागणारे पाणी पाडळसरे धरणातून उपलब्ध होईल यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असा वादाही वाघ यांनी केला.
भुमीपुत्र हाच जातीधर्म
        यावेळी मंत्री अनिल पाटील म्हणाले की,फोन पे च्या माध्यमातून पैसे टाकून दारू प्या असे सांगणारी संस्कृती अमळनेरची नाही. आमचा भूमिपुत्र हाच आमचा जातीधर्म  असं तालुक्याने दाखवून द्यायला सुरुवात केली आहे. माझ्याकडून काही छोट्या चुका झाल्या असतील तर माफी मागतो. गावागावातील गैरसमज दूर करा. विकास कामांचा जाहिरनामा प्रसिद्ध केल्यानन्तर ते पत्रकारांशी बोलत होते. अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर केला नाही याला मंत्री जबाबदार आहे असा आरोप होत आहे या प्रश्नावर ते म्हणाले की दुष्काळ कसा जाहीर होतो हे विरोधकांना माहीत नाही. मी पीक विमा अनुदान, मागील बाकी असे सुमारे साडेसहाशे कोटी रुपये अमळनेर तालुक्याला मिळवून दिले.भूजल पातळी वाढली आहे. शेतकऱ्यांची उत्पन्न क्षमता वाढली तर पीक विमा जास्त मिळतो यात शेतकऱ्यांचा फायदा आहे असा खुलासा त्यांनी केला.
साहेबराव पाटील हुशार माणूस
           माजी आमदार साहेबराव पाटलांचा आपण गेम केला असा आरोप आपल्यावर होत आहे या प्रश्नावर मंत्री अनिल पाटील म्हणाले की साहेबराव पाटील हुशार माणूस आहे. त्यांचा कोणी गेम करू शकेल असा कोणी नाही. उलट ते निवडणुकीत कोणाचा गेम करतील हे सांगता येत नाही.  माजी आमदार शिरीष चौधरी हे भाजपचे सदस्यच राहिले नाहीत. भाजपशी त्यांचा काहीच संबंध राहिलेला नाही असेही स्पष्टीकरण अनिल पाटील यांनी केले.
     राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्याचा जाहिरनामा अजित पवार यांनी ऑनलाईन प्रकाशित केल्यावर त्यांनी प्रत्येक स्थानिक पातळीवर जाहिरनामा प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. 
यांची होती उपस्थिती
अमळनेर मतदार संघाचा जाहीरनामा प्रसिद्ध करतांना व्यासपीठावर मंत्री अनील पाटील ,खासदार स्मिता वाघ , शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत पाटील,शहराध्यक्ष मुख्तार खाटीक ,भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष  विजय पाटील,माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील,संजय कौतिक पाटील , माजी जि.प.सदस्या जयश्री पाटील,बाजार समिती सभापती अशोक पाटील,अॅड.व्ही आर पाटील,महेंद्र बोरसे , प्रा.सुरेश पाटील,प्रा.मंदाकिनी भामरे ,आशा चावरीया,   यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.