*अमळनेर* : येथील मंगळग्रह सेवा संस्था ही सामाजिक जाणिवेचे उचित भान राखत सेवेकऱ्यांचे हित जोपासणारी संस्था म्हणून कार्यरत आहे. या संस्थेच्या पुढाकारातून भारतीय टपाल विभागातर्फे अधिकाऱ्यांनी टाटा एआयजी आणि बजाज अलायन्स या कंपन्यांच्या मदतीने विविध अपघाती विमा योजनांची माहिती तसेच योजनांतील सहभागासाठी अर्ज कसा करावा, यासंदर्भात सेवेकऱ्यांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
काय आहे योजना
या अपघाती विमा योजनेचा लाभ १८ ते ६५ वयोगटांतील व्यक्तींना घेता येणार आहे. या योजनेंतर्गत संबंधित व्यक्तीला अपंगत्व आल्यास, पॅरालिसीस झाल्यास अथवा अपघाती मृत्यू झाल्यास कंपन्यांच्या मदतीने टपाल विभाग आर्थिक लाभ मिळवून दिला जाणार आहे. या योजनांमध्ये सहभाग नोंदवायचा असल्यास अर्ज कसा भरावा तसेच त्यासाठी लागणारी विविध कागदपत्रे यांचीही माहिती यावेळी भारतीय टपाल विभागाचे संदीप रावण पाटील, विनोद चौधरी,इंद्रजीत संजीव पाटील, राहुल प्रकाश मिस्तरी व चेतन कैलास गोसावी यांनी सेवेकऱ्यांना दिली. त्यानंतर सेवेकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विमा योजनेच्या सहभागाचे अर्ज भरले. मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी यांच्यासह मनोहर तायडे, योगेश पाटील, रजनीकांत पाटील यावेळी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
योजना व मिळणारा लाभ
हा ग्रुप गार्ड वैयक्तिक अपघात विमा आहे. ५२० तसेच ५९९ रुपये वार्षिक हप्त्याच्या या विमा योजना आहेत. यामध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास, कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास, आंशिक अपगत्व आल्यास १० लाख रुपये वारसाला आर्थिक लाभ मिळेल. तसेच अपघात होऊन विमाधारकाला रुग्णालयात दाखल केले असल्यास रुग्णालयाचा दैनिक भत्ता म्हणून १० दिवसांसाठी ५००/- रुपयांप्रमाणे, अंत्यसंस्कार खर्च ५०००/- रुपये, मृत्यूच्या अवशेषांची वाहतूक ५०००/- रुपये, कोमा केअर-५०००/- अपघाती स्थिती रुग्णालयात दाखल-५० हजार रुपये, रोड रुग्णवाहिका -प्रत्येक दाव्यासाठी १,०००/- रुपये, एअर अॅम्ब्युलन्स १ लाख रुपये, जीवनशैलीत बदल १० हजार रुपये, मुलांचे शिक्षण लाभ ५० हजार रुपये, टेलि सल्ला-अमर्यादित, तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी आर्थिक लाभ दिला जातो.
