*अमळनेर:-* येथील नगर पालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर माजी आमदारांनी जो आनंदोत्सव साजरा केला आहे तो आनंद म्हणजे "बेगाने की शादी मे अब्दुल्ला दिवाना"असा प्रकार असून तो उमेदवार कुणाच्या क्रेडिटवर निवडून आला याचे स्वतः आत्मपरीक्षण करावे, जनतेलाही ते ठाऊक असल्याने त्यांना सांगण्याची मुळीच गरज नाही असा टोला माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील यांनी माजी आमदारांना उद्देशून लगावला आहे.
ताई - दादा आमच्या सोबत
यासंदर्भात आमदार पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की या निवडणुकीत आमच्यासोबत कोण होते आणि कोण नव्हते हे सांगण्याची गरज नसून जनताही दुधखुळी नाही.खासदार स्मिताताई वाघ व माजी आमदार साहेबराव दादा आमच्यासोबतच होते आणि यापुढेही राहतील त्याबाबत आम्हाला काय येथील जनतेलाही शंका नाही.
नगराध्यक्ष पदाचा विजय स्वतःच्या क्रेडिटवर
तुमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार स्वतःच्या क्रेडिटवर निवडून आला असला तरी जनतेचा कौल आम्ही स्वीकारला असून तुम्हाला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.याउलट नंदुरबारच्याही विजयाचा तुम्ही गाजावाजा करतात परंतु नंदुरबार पालिका निवडणूकित तुमच्या दोनच जागा निवडल्यात आणि किती पडल्यात हे जनतेलाही जरा कळू द्या.तुमचा स्वतःचा पुत्र किती कमी मतांनी निवडला हे देखील येथील जनतेला कळू द्या.तेथे तुम्हाला यश मिळाले नाही याचे कारण म्हणजे नंदुरबारची जनता तुम्हाला चांगली ओळखून असल्याने दुसऱ्यांदा तुम्हाला नाकारले आहे आणि राहिला अमळनेरचा प्रश्न तर नगराध्यक्ष पदाचा विजय हे तुमचे वैयक्तिक यश नाहीच,त्यासोबतच नगरसेवक पदाचे जे तुमचे थोडेफार उमेदवार निवडून आले असतील ते तुमचे असो की आमचे त्यांनी आपापल्या स्वतः प्रभागात वर्षानुवर्ष केलेल्या कामाचे फलित असून त्याचे क्रेडिट तुम्ही किंवा आम्ही घेण्याचे काहीही कारण नाही.
विकास कामांसाठी आमचे सहकार्य
यापुढे असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा विकासाचे व्हिजन म्हणून शहरात विकास कामांसाठी मी अफाट पैसा आणला.शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी २४ बाय ७ योजना आणून तिचे कामही सुरू केले. रस्त्यांच्या कामासाठी मोठा निधी आणला.त्याकडे लक्ष केंद्रित करून ती कामे कशी लवकरात लवकर पूर्ण होतील त्यासाठी प्रयत्न करा.राहिलेले काम लवकर पूर्ण करा,तुमच्या नगरसेवकांना २ ते ४ कोटींची कामे कशी मिळतील त्यासाठी प्रयत्न करा,निवडणूक वचननाम्यानुसार प्रॉपर्टी टॅक्स कमी करणे असेल याशिवाय इतर महत्वपूर्ण विकास कामांसाठी आमचे पूर्ण सहकार्य असणार असल्याने ते पूर्ण करा.
मी रात्रंदिवस जनतेच्या सेवेत
तसेच माजी आमदारांना माझ्या मंत्री पदाबाबत चिंता आहे की धाक याबाबत मी देखील संभ्रमात आहे.परंतु त्यांनी काळजी करू नये मंत्रिपद आज मिळो की उद्या आजही या भुमीतील विकासाचा आलेख उंचविण्यासाठी आमदार म्हणुन मी सक्षम असून तुम्ही नंदुरबारकर असल्याने तिकडेच चांगले लक्ष घालावे. निवडणूक येते आणि जाते आणि राजकारणात स्तर बदलतही असतात येणाऱ्या काळात निश्चितच या भूमीच्या दृष्टीने चांगलं घडलेलं तुम्हाला दिसेल.त्यामुळे "वेट अँड वॉच" करा असा सल्ला आमदार अनिल पाटील यांनी देत मी जनतेसाठी रात्रंदिवस कधीही उभा राहील अशी ग्वाही देखील आमदार पाटील यांनी दिली आहे .
