माजी आमदार शिरीष चौधरींच्या वक्तव्याने अमळनेरात महिला व कार्यकर्त्यांचा उद्रेक


आमदारांच्या पत्नीबद्दल अपशब्द भोवले,पालिकेसमोर जमावाने पुतळ्यास चपलांचा मार देऊन केले पुतळादहन


अमळनेर:- माजी आमदार शिरीष चौधरीं यांनी नगराध्यक्ष पद्ग्रहण सोहळ्यात आमदार अनिल पाटील यांच्या पत्नीबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याने अमळनेर शहरात काल महिला व कार्यकर्त्यांचा प्रचंड उद्रेक झाला.असंख्य महिला पुरुष व तरुणांच्या जमावाने हजारोंच्या संख्येने पालिकेसमोर एकत्र येत शिरीष चौधरींच्या पुतळ्यास चपलांचा मार देऊन पुतळा दहन केले.
माजी आमदारांच्या घरावर मोर्चा
        एवढेच नव्हे तर हा जमाव शिरीष चौधरीच्या स्टेशन रोडवरील निवासस्थानी देखील धडकला होता.या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी झाल्याने सदर प्रकारामुळे अमळनेर शहर व तालुक्याची शांतता भंग होण्याची स्थिती निर्माण झाली होती.
सुदैवाने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने काही विपरीत घडले नाही.परंतु यावेळी काहींनी चौधरी यांच्या घराच्या दिशेने बांगड्या फेकत निषेध व्यक्त केला.

पदग्रहण सोहळ्यात केले चुकीचे वक्तव्य

         अमळनेर नगर पालिकेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या पद्ग्रहण प्रसंगी माजी आमदार चौधरी यांनी आमदार अनिल पाटील यांच्या पत्नीबद्दल चुकीचे वक्तव्य केले होते. हे भाषण फेसबुकवर लाईव्ह असल्याने भाषणाच्या क्लिप शहर व तालुक्यात व्हायरल झाल्या होत्या.या भाषणामुळे शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते व महिला भगिनींमध्ये संतापाची भावना निर्माण झाली.सुरवातीला सोशल मीडियावर या वक्तव्याचा जोरदार निषेध सुरू झाला.
त्यानंतर मात्र दुपारी 3 वाजेनंतर शहर व ग्रामीण भागातील हजारोंचा जमाव पालिकेसमोर एकत्र आला. सर्वानी निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.महिलांनी मनोगतात महिलेच्या अपमानाबद्दल तीव्र निषेध व्यक्त करून चौधरी यांनी आमदारांच्या पत्नीची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. यानंतर महिलांनी चौधरी यांच्या पुतळ्यास बांगड्यांचा हार टाकून चप्पल व जोडे मार आंदोलन केले व नंतर पुतळा दहन करण्यात आला.
     त्यानंतर मोर्चा रुपात हा जमाव शिरीष चौधरी यांच्या कार्यालयासमोर धडकला.तेथे घोषणाबाजी केल्यावर महाराणा प्रताप चौकात घोषणाबाजी करून निषेध म्हणून टायर जाळण्यात आले.त्यानंतर हा जमाव आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचून तेथेही घोषणाबाजी झाली.तेथे भाजपाचे अॅड. व्ही.आर. पाटील,हिरालाल पाटील,भागवत पाटील, मनोज पाटील,प्रा मंदाकिनी भामरे यांनी मनोगत व्यक्त करून निषेध व्यक्त केला.हा अमळनेर तालुक्यातील प्रत्येक महिलेचा अपमान असल्याचे सर्वानी सांगत बुक ठोकणा-यांना महिलांनी त्यांची जागा दाखवली.शिंदे साहेब एकीकडे लाडकी बहीण योजना आणून महिलांचा सन्मान करतात आणि दुसरीकडे महिलांचा सन्मान न करणा-यांना पक्षात घेतात अशी भावना व्यक्त करत असे प्रकार पुन्हा घडल्यास त्यांना जागा दाखवू असा इशारा दिला.
हेच अमळनेरला पाहिजे होते का ?
     आमदार अनिल पाटील उपस्थितांना संबोधित करतांना म्हणाले की तालुक्यात पुन्हा एकदा विचित्र संस्कृती, व गुंडाराजचे आगमन झाल्याचे आपण यांच्या भाषणात बघितले.हेच अमळनेरला पाहिजे होते का.? असा सवाल उपस्थित केला. आपण सर्वानी मिळून यांना विधानसभेत घालवले होते. तरीही पालिका निवडणुकीत आम्ही जनतेचा कौल स्वीकारून शुभेच्छा दिल्या पण यांना यश पचविता आले नाही.ते मर्द असतील तर माझ्याशी मुकाबला करायचा होता,बाईंची अशी इज्जत घेणे योग्य आहे का.एखाद्या महिलेला नवऱ्याने स्वातंत्र्य दिले असेल तर तिच्या नवऱ्याला तीला सांभाळता येत नाही असे तुम्ही म्हणाल का? खरे तर कोणत्याही स्त्रीचा सन्मान केला पाहिजे.असे बोलल्यावर त्या मंचावरील महिला नेत्या पण काही बोलल्या नाहीत. माझी पत्नी ३० वर्षांपासून माझा कार्यभार सांभाळते,कुणाला आई व मुलाचे कुणाला मुलगी तर कुणाला सून व वहिनीचे नाते लावते हेच त्यांना सहन झाले नसावे.त्याठिकाणी टाळ्या वाजविनाऱ्यांना लाज वाटली पाहिजे होती. यांचे कार्यकर्ते कोणत्याही समाजाच्या मुली पळविल्या जात असतील तर त्यांना फूस लावतात.ही कुठली विकृती.सर्व समाजाला माझी विनंती आहे की महिलांचा असा अपमान होत असेल तर आता आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल असे सांगत महिलेच्या सन्मानार्थ धीटपणे रस्त्यावर उतरल्याने जनतेचे व महिला भगिनींचे ऋण त्यांनी व्यक्त केले आणि माझे कर्तव्य मी सोडणार नाही.आमदार म्हणून अमळनेरची सुरक्षितता करत राहील अशी ग्वाही त्यांनी जाहीरपणे दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.