सदर प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशीची मागणी
घर पाडण्याच्या घटनेशी माझा काहीही संबंध नाही - सरजूशेठ गोकलानी
अमळनेर - शहरातील न्यू प्लॉटमधील देशमुख चाळीतील भाडेकरी शरद शिंदे यांचे राहते घर दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी जेसीबीने उध्वस्त करणा-यांना अटक करण्यात यावी व सदर प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष प्रा.अशोक पवार यांनी केली आहे.
या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक सरजू गोकलानी, महेश देशमुख व इतर ५-६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण अद्याप काही कारवाई झाल्याचे दिसत नाही. तर आरोपींना त्वरित अटक करावी. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी २४ तास उशिरा फिर्याद नोंदविली व फिर्यादीस समेंट करण्यासाठी दडपण आणले अशा पक्षपाती व बिल्डरांची बाजू घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडून सदर प्रकरणाचा तपास काढून घ्या व सीआयडी मार्फत चौकशी करा अशीही मागणी प्रा.अशोक पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
देशमुख चाळीत सुमारे २०भाडेकरू असून त्यात नयन शरद शिंदे व योगेश रमेश पवार हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. देशाच्या संरक्षणासाठी प्रसंगी प्राण देणाऱ्यांचे कुटुंब अमळनेरात सुरक्षित नाही. ही साने गुरुजींच्या कर्मभूमीत लाजिरवाणी घटना आहे.धन दांडगे पोलिसांच्या सहकार्याने गरिबांना उध्वस्त करण्याचे पाप करीत आहेत. त्यामुळे गरीब व महिला वर्ग भयभीत झाला असून ते घरे सोडून इतरत्र पळ काढत आहेत आणि धनदांडगे मात्र दिवसाढवळ्या कायदा हातात घेत आहेत.
वरील प्रकरणाची आमदार अनिल भाईदास पाटील व खासदार स्मिताताई वाघ यांनी गंभीर दखल घ्यावी व ही गुंडगिरी मोडून काढावी अशी मागणीही प्रा.पवार यांनी नागरिकांच्या वतीने केली आहे.
नागरिकांना आवाहन
अमळनेरच्या इतिहासात प्रथमच अशी काळीकुट् घटना घडली आहे. याची गंभीर दखल अमळेकरांनी घ्यावी व आगामी काळात होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भाडेकरुंच्या वतीने करण्यात येत आहे.
आतापर्यंत बिल्डरांच्या दबावाला बळी पडून ज्यांच्या जागा त्यांनी ताब्यात घेतल्या आहे अशांनी प्रा.अशोक पवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
शासनाकडे दाद मागणार
वरील प्रकरणी भाडेकरू व सामाजिक कार्यकर्ते मा.उच्च न्यायालय,खंडपीठ औरंगाबाद, मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र, पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य,डीआयजी नाशिक परीक्षेत्र,महसूल आयुक्त, नाशिक. जिल्हाधिकारी, जळगाव व डीवायएसपी,अमळनेर यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार आहोत.
घर पाडण्याच्या घटनेशी माझा संबंध नाही - सरजूशेठ गोकलानी
शहरातील न्यु प्लॉट भागातील देशमुख चाळ येथील शरद जाधवराव शिंदे यांचे घर पाडण्याच्या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. मला गोवण्याचा प्रयत्न होत आहे अशी प्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिक सरजूशेठ गोकलानी यांनी दिली आहे.
याबाबत आपली भुमिका मांडतांना श्री गोकलानी म्हणाले की, माझ्या बांधकाम साईटवर असलेले जेसीबी मदतीसाठी नेण्यात आले होते.ते कोणत्या कामासाठी नेले याची मला माहिती नव्हती. त्यामुळे सदर प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही. मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होत आहे. पोलिस तपासात यातील सत्य बाहेर येईल अशी प्रतिक्रिया श्री सरजूशेठ गोकलानी यांनी दिली आहे.
