' माझा संकल्प- भूमी सुपोषण‌’ चळवळीसाठी अमळनेरला बुधवारी भव्य महाशोभायात्रा


अक्षय कृषी परिवार,मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे उपस्थितीचे आवाहन


*अमळनेर -* कृषी क्षेत्रातील अग्रगण्य सेवाभावी संस्था अक्षय कृषी परिवार व येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे माझा संकल्प- भूमी सुपोषण चळवळीचा जनजागर व्हावा, यासाठी उद्या बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी भव्य महाशोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक व अभूतपूर्व होणाऱ्या या महाशोभायात्रेचे अमळनेरकरांनी साक्षीदार व्हावे, असे आवाहन अक्षय कृषी परिवार व श्री मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
महाशोभायात्रा प्रारंभ स्थळ व मार्ग
                उद्या बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता संतश्री सखाराम महाराज वाडी संस्थान येथून महाशोभायात्रेस प्रारंभ होईल. संतश्री सखाराम महाराजांची वाडी- सराफ बाजार- कोंबडी बाजार- हॉटेल पायल- राणी लक्ष्मीबाई चौक- मोठा बाजार- दगडी दरवाजा- फरशी रोडमार्गे श्री मंगळग्रह मंदिरात महाशोभायात्रेची सांगता होईल.
महाशोभायात्रेची जय्यत तयारी
         महाशोभायात्रा अविस्मरणीय व ऐतिहासिक व्हावी यादृष्टीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. शहर व ग्रामीण भागातून शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाशोभायात्रेचे अंतर व कालावधी लक्षात घेता 
महाशोभायात्रा सुरू होण्यापूर्वी सर्वांना पोटभर नाश्ता दिला जाणार आहे. महाशोभायात्रा मार्गावरही ठिकठिकाणी गोळ्या- बिस्किटे, हलका- फुलका नाश्ता व जलपानाची व्यवस्था केली जाणार आहे. तर मंदिरात महाशोभायात्रेतील सहभागींसाठी भोजन व्यवस्था आहे.
सहभागाचे आवाहन
सर्व शाळा- महाविद्यालये, विद्यार्थी- विद्यार्थिनी,विविध सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व महिला संघटनांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अक्षय कृषी परिवार व श्री मंगळग्रह सेवा संस्थेने केले आहे.

-----------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.