रीडिंगचे फोटो नाही, अंदाजे बिलांचा आरोप; स्मार्ट मीटरच्या तक्रारींमध्येही वाढ
अनेक ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष वीजवापराशी बिलाची रक्कम जुळत नसल्याने त्यांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मीटर रीडिंग घेताना योग्य पद्धतीने नोंद केली जात नसल्याचा आरोपही काही ग्राहकांकडून करण्यात येत आहे. परिणामी, बिलात तफावत आढळल्यानंतर ग्राहकांना तक्रार घेऊन महावितरणच्या कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
तक्रार घेऊन गेलेल्या ग्राहकांना समाधानकारक उत्तर मिळते का?
वीजबिलातील तफावत किंवा मीटरच्या समस्येबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही अनेक ग्राहकांना समाधानकारक तोडगा मिळत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ग्राहकांना समजावून सांगितले जाते; मात्र प्रत्यक्ष समस्येचे निराकरण वेळेत होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिलिंग पद्धतीबाबतही ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मीटर, रीडिंग आणि बिलाची रक्कम याबाबत स्पष्ट माहिती मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ग्राहकांचा सवाल : चुकीचे बिल असेल तर जबाबदार कोण?
वीज ग्राहकांनी वेळेवर बिल भरायचे, पण बिल चुकीचे किंवा वाढीव आले तर त्यासाठी ग्राहकांनीच कार्यालयाच्या फेऱ्या का मारायच्या? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देऊन मीटर रीडिंगची पारदर्शक व्यवस्था करावी, प्रत्यक्ष रीडिंगनुसारच बिल आकारावे, वाढीव बिलांची तातडीने पडताळणी करावी आणि स्मार्ट मीटरबाबतच्या तक्रारींचे निराकरण करावे, अशी मागणी होत आहे.
नागरिकांच्या या तक्रारींवर महावितरण प्रशासन नेमके काय उत्तर देणार? याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

