संविधानाचा सन्मान,देशहितासाठी सकारात्मक कार्य महत्वाचे-प्रा.डॉ. एल.ए.पाटील

Wednesday, November 27, 2019

/ by Amalner Headlines

अमळनेर -
  संविधान हाच आपला धर्म असून त्‍याचा आदर करा. नागरिकांची कर्तव्ये समजून घ्यावी.विचारी माणसांने चांगल्या कामाच्या बाजुने उभे रहावे.देशहितासाठी सकारात्मक भाव असणे महत्त्वाचे आहे.जात निघाली की धर्म निघेल मग मानव जन्‍म सुसह्य होईल असे मत नॅनो शास्‍‍त्रज्ञ तथा प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. एल. ए. पाटील यांनी केले. 
येथील शिवशाही फाऊंडेशनतर्फे आयोजित  "भारतीय संविधानाचे योगदान" या विषयावरील व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. तहसीलदार मिलींदकुमार वाघ अध्यक्षस्‍थानी होते. शिक्षण विस्‍तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे, प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. ओ. माळी, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. देशमुख, विजयनाना पाटील आर्मी स्‍कुलचे प्राचार्य एस. यू. पाटील, शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे, व्यासपीठावर उपस्‍थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/ ११ च्या हल्ल्यात शाहिद झालेल्या वीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय सोनवणे (पिंगळवाडे), सहायक शिक्षिका दर्शना चौधरी (शिरुड), साने गुरुजी माध्यमिक पतसंस्‍थेच्या नूतन अध्यक्षा सुलोचना पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला. डॉ. पाटील पुढे म्‍हणाले की, काही राजकीय लोक स्‍वातंत्र्य समता यांचा विचार करत नाहीत. शिक्षणाने आम्‍ही खोटं बोलायला शिकलो आहोत. सगळ्या संवेदना, व्‍यथा समजून घेऊन राज्‍य घटनेचे लिखाण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. सेवा, त्‍याग, चारित्र्य आहे म्‍हणुन किर्ती आहे. जग हे समुहाकडून व्‍यक्‍तीकडे चालले आहे. घटना दांडगाई करणाऱ्यांपर्यंत अजून पोहचलेली नाही. कोणत्याही लग्नपत्रिकेत राजकीय व्‍यक्‍तींना अगोदर स्‍थान असते. त्‍यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील व्‍यक्‍तींना महत्त्व दिले जाते, ही बाब चुकीची आहे. यात बदल झाला तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल. मॅनेज केलेली कोणतीही गोष्ट टिकाऊ नसते.
 
सत्‍य हे नेहमीच सत्‍य असते. हक्कांचा जन्‍म कर्तव्‍यातून होतो. यासाठी प्रत्‍येक नागरिकाने सामाजिक व शैक्षणिक तंदुरुस्‍तीसाठी पुढे यावे
       - प्रा.डॉ. एल.ए.पाटील 

तहसीलदार श्री. वाघ म्‍हणाले, की जगातील सर्व लोकशाहीचा अभ्यास करुन डॉ. बाबासाहेबांनी सर्व मुलभूत गोष्टींचा समावेश भारतीय संविधानामध्ये केला. आज आपण मुलभूत हक्कांची मागणी करतो. मात्र, त्‍याचबरोबर मुलभूत कर्तव्‍यांचीही जाणीव प्रत्‍येक भारतीयांनी ठेवली पाहिजे. तरच देशाचा सर्वांगीण विकास होईल. व्‍ही. डी. पाटील यांनी संविधान वाचन केले. विशाल देशमुख यांनी परिचय करुन दिला. डी. ए. धनगर यांनी प्रास्‍ताविक केले. निरंजन पेंढारे यांनी सूत्रसंचालन केले. उमेश काटे यांनी आभार मानले. यावेळी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines