अमळनेर : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांचे निधन झाले. आमदार स्मिता वाघ यांचे ते पती होत. त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष पद भूषविले होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अमळनेर व जळगाव शहरातील त्यांच्या कार्यालयावर समर्थकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली.
आज सकाळी १० वाजेच्या सुमारास आंघोळ करीत असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.उद्या (दि.२९ रोजी) सकाळी १० वाजता डांगर बु.॥ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उदय वाघ यांचा जीवन परिचय
अमळनेर तालुक्यातील डांगर बु.॥ या छोट्याशा गावात सामान्य शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. विद्यार्थी दशेपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ते चळवळीत सक्रिय काम करत होते. जळगाव येथे जनशक्ती,गावकरी,तरूण भारत या वृत्तपत्रात पत्रकारिता व त्यानंतर गणेशा व वरद ऑफसेट या नावाने प्रिंटींग व्यवसाय सुरू केला. जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. डांगर बु.॥ ग्रामपंचायतीचे सरपंचपदही त्यांनी भूषविले होते.येथूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीस सुरूवात झाली. भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस,भाजयुमो प्रदेश चिटणीस,भाजपा जिल्हा सरचिटणीस,दोन टर्म भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक,अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशी त्यांची सामाजिक व राजकीय कारकिर्द होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
No comments
Post a Comment