सर्व व्यक्ती समान प्रतिष्ठेच्या असणं म्हणजे समानता पत्रकार डॉ.गीताली विनायक मंदाकिनी यांचे मत

अमळनेर-
समानता म्हणजे केवळ सारखेपणा नव्हे तर सर्व व्यक्ती समान प्रतिष्ठेच्या असणं म्हणजे समानता होय.अशी समानता आजच्या स्त्री पुरुषांमध्ये आली पाहिजे तरच समाज खऱ्या अर्थाने प्रबळ होईल असे मत जेष्ठ लेखिका तथा संपादिका डॉ.गीताली विनायक मंदाकिनी यांनी अमळनेर येथील व्याख्यानात व्यक्त केले. जी.एस. हायस्कूलच्या आयएमए हॉलमध्ये शिवशाही फाऊंडेशन व सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "माध्यमं व स्त्री-पुरुष समानता" या विषयावर त्या बोलत होत्या.
     माजी प्राचार्य तथा सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.ए.जी.सराफ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे होते. डॉ.गीताली पुढे म्हणाल्या, स्त्री-पुरुष हे एकमेकास विरुद्ध नसून ते परस्पर पूरक आहेत. लग्नापूर्वी स्त्रीचे पालक वडील असतात म्हणून त्यांच्या नावानंतर वडिलांचे नाव लागते. मात्र लग्नानंतर नवरा हा बायकोचा पालक नसून जोडीदार असायला पाहिजे.पुरुषांनीही स्रियांसारखं त्यागी,सोशिक का असू नये? व्यवस्था ही लिंगाधिष्ठित आहे, म्हणून स्त्रीला दुय्यम स्थान दिलं गेलं. त्यामुळे बायकांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला.
तश्या पध्दतीने ते आजही तो न्यूनगंड घेऊन वावरत आहेत. स्त्री-पुरुष मध्ये सहचार्य असले पाहिजे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. स्रियाबरोबर पुरुषांनीही मुलांचं संगोपण केलं पाहिजे. आजच्या युगात केवळ देखाव्यासाठी महिलांना मानाचे स्थान दिले जाते मात्र आतील गोष्टी अजूनही वेगळ्याच आहेत. कथनी व करणी सारख्याच असल्या पाहिजे. सगळ्यांनी चांगला माणूस होणं गरजेचं आहे. स्त्री-पुरुषांचं भावविश्व माणुसपणाने एकत्र येण्याची गरज आहे. अध्यक्षीय भाषणात डॉ.सराफ म्हणाले, अमळनेर हे साने गुरुजीची कर्मभूमी आहे.सानेगुरुजींनी जगाला प्रेम करण्याचं शिकवलं म्हणून सानेगुरूजींच्या विचारांचा जागर करण्याची गरज आहे. हा जागर  सुरुवातीला आपल्या शहरापासून होणे गरजेचे आहे. 
         यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून अमळनेर तालुक्यातील पत्रकारांना सन्मानपत्र व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या कार्यवाह दर्शना पवार यांनी प्रास्ताविक केले. शिवशाही फाउंडेशनचे सचिव उमेश काटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन शरद पाटील व उमेश काटे यांनी केले. जयेशकुमार काटे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.