पाडळसरे येथे उद्या "नाटेश्वर महादेव" यात्रोत्सव त्रिवेणी संगमावर स्थित आहे प्राचीन शिव मंदिर

अमळनेर -
तालुक्यातील पाडळसरे येथे उद्या श्री नाटेश्वर महादेव मंदीरात यात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमीत्ताने महापूजा, महाप्रसाद व मनोरंजनासाठी लोकमान्य तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

      तापी,अनेर व बोरी नदीच्या त्रिवेणी संगमस्थानी दक्षिण तीरावर श्री क्षेत्र नाटेश्वर महादेव मंदीर हे येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन व  जागृत देवस्थान आहे.भक्तांच्या  नवसाला पावणारा नाटेश्वर महादेवाचा यात्रोत्सव दरवर्षाप्रमाणे या वर्षी ही माघ कृष्ण दशमी म्हणजेच मंगळवारी दि. १८ रोजी स्थानिक  ग्रामस्थांकडून साजरा करण्यात येणार आहे. या ठिकाणी पुर्वी पासुनच बोकड बळीची प्रथा नसल्याने देवाला दाळ बट्टीचा शाकाहारी नैवेद्य दाखविण्यात येतो व नवस फेडण्यात येतो.
अहिल्याबाई होळकरांनी केला मंदीराचा जिर्णोद्धार -आख्यायिका
    भाविकांच्या नवसाला पावणारे जागृत शिवलिंग म्हणून द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रति नाटेश्वर महादेवाचे शिवलिंग व मंदिर विलोभनीय असून काळ्या दगडांनी हेमांडपंथीय स्थापत्य शास्त्राच्या पद्धतीने मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. कोरीव आरेखन घुमटाच्या वर चार उपदिशांना वाघाच्या मूर्त्या व त्यावर कळस आणी भागवत धर्माची भगवी पताका व मंदिरात पाषाण शिळा त्यात शिवलिंग हे संगमरवरी आहे.धुळे व जळगाव जिल्ह्य़ाच्या  सीमेवर चोपडा,शिरपुर व अमळनेर या तीन तालुक्यांच्या सीमेच्या केंद्रबिंदूवर सुर्यमुखी  मंदिराच्या समोर पश्चिम वाहिनी सूर्यकन्या  तापी,दक्षिण वाहिनी अनेर व उत्तर वाहिनी बोरी या तीन नद्यांच्या अतिशय रमणीय व  नैसर्गिक परिसरात त्रिवेणी संगमस्थळी नाटेश्वर महादेवाचे शिवलिंग व मंदिर स्थापित आहे. 
नवसाला पावणारे नाटेश्वर महादेव म्हणून ख्याती असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार थोर शिवभक्त व कुशल राज्यकर्ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी कपिलेश्वर मंदिर जीर्णोद्धार समयी केला असल्याची आख्यायिका आहे.
यात्रेची तयारी पूर्ण
     यात्रेच्या दिवशी  सर्व जाती धर्माच्या कुटुंबीयांकडून महादेवाला दाळ बट्टीचा शाकाहारी नैवेद्य दाखविला जातो. नवसपुर्ती साठी येथे भाविक गर्दी करतात. 
ग्रामवासीयांच्या करमणूकी साठी पाडळसरे ग्रामपंचायतीने सुकलाल भाऊ बोराडिकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात केले आहे. तर खेळणी, पाळणे, खाद्य पदार्थ विक्रीसाठी उपहारगृह आदींसह संसारोपयोगी वस्तुंची  दुकाने थाटली जातात.
----------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.