अमळनेर येथे व्यापा-यावर गोळीबाराच्या निषेधार्थ बंद व मूक मोर्चा गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई न केल्यास गृहमंत्र्यांकडे तक्रार- आ.अनिल पाटील यांचा इशारा

अमळनेर -
सोमवारी रात्री येथील न्यु प्लॉट परिसरात लुटीच्या उद्देशाने व्यापा-यावर  झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ अमळनेर शहरातील सर्व सिंधी व इतर व्यापाऱ्यांनी बंद पुकारून काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढला. यावेळी व्यापाऱ्यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारी विरुद्ध प्रचंड नाराजी व्यक्त करीत बेमुदत बंदचा इशारा दिला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करूनही लक्ष दिले जात नसल्याचा आरोप आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे. पोलिसांनी तत्काळ लक्ष न दिल्यास याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार करू असा इशाराही आ.अनिल भाईदास पाटील यांनी दिला आहे. 
कुठे झाला गोळीबार
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नर्मदा वाडी जवळ बसंतराय तेजुमल बितराई व अजय यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गावठी पिस्तूलने गोळीबार केला होता. सुदैवाने गोळी भिंतीला लागली. त्यामुळे अनर्थ टळला.या घटनेमुळे  शहरात सामान्य नागरिक व व्यापा-यांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. 
व्यापा-यांनी पुकारला बंद
    व्यापा-यांनी आज मंगळवार दि. ४ रोजी बंद पुकारून मोठ्या बाजार पेठेतून मुकमोर्चा काढला. राणी लक्ष्मीबाई चौकातून सुभाष चौक मार्गे गंगाघाट बाजारपेठ, भागवत रोड, बसस्थानक मार्गे मोर्चा प्रांत कचेरीवर आला. यावेळी व्यापारी तथा माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांनी वाढत्या गुन्हेगारीला आळा न बसल्यास बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा दिला तर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे यांनी घटनेचा निषेध व्यक्त करीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष घालण्यासाठी साकडे घालू असे सांगितले. शहरातील सीसीटीव्हीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या बंदला फोटोग्राफर संघटना आणि मेडिकल दुकानदारांनी पाठिंबा दिला होता. मोर्चात लालचंद सैनानी, भरत ललवाणी, शंकर बितराई, रोहीत बठेजा,प्रकाश शहा, चेलाराम सैनानी,हरेश वाधवानी,हीरानंद पंजाबी,बापु हिंदुजा,राजकुमार रंगलानी, पपुसेठ सैनानी, सेवक हिंदुजा, सरजु गोकलानी ,सोनु तोलानी,जितेंद्र तोलानी, गोपाल नागदेव, ठाकुर सैनानी, संजय बितराई, घनश्याम थदानी, झामनदास सैनानी, पहेलाज थावरानी, प्रकाश जग्यानी,महेश आहूजा,महेश आयलानी,प्रेम सैनानी,सत्यपाल निरंकारी,सुंदरदास माधवानी, राजेश पंजवानी, जेठानंद तोलानी, सुरेश बठेजा, विकी वाधवानी, अजय सासनानी, भारत सासनानी, सुरेश कुंदनानी राजकुमार बितराई, गोविंद आहुजा बिपीन कोठारी, महेश कोठावदे, राजेश कोठावदे, दिलीप सैनानी, राकेश माहेश्वरी, हरि भिका वाणी, पंकज मराठे, विनोद कोठारी, फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष महेंद्र पाटील, अनिल कोराणी, पुरुषोत्तम शेट्ये, विलास चौधरी, श्रीराम चौधरी, राकेश ललवाणी यांच्यासह सुमारे ३०० व्यापारी सहभागी झाले होते.
तक्रार करूनही पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष-आ.अनिल भाईदास पाटील
          मी निवडून आल्यानंतर लगेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र तरीही वाढत्या शस्त्र गुन्ह्यांचे प्रकार वाढीस लागले आहेत. यामुळे आपण केलेल्या तक्रारीप्रमाणे वॉश आऊट सारखी कोणतीही मोहीम राबवली गेली नाही असे दिसते अशी प्रतिक्रिया आमदार अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केली. वारंवार व्यापारी गुन्हेगारांचे लक्ष होत असून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात तब्बल १५०च्या वर गावठी कट्टे आहेत. याबाबत पोलीस दलाकडून कोणतीही मोहिम राबविण्यात आलेली नाही. छोटे मोठे गुन्हेगार सर्रास गावात फिरतात. त्यांचे कोंबिंग आॅपरेशन राबविण्यात येत नाही, ही बाब शहराच्या दृष्टीने लाजीरवाणी गोष्ट असून याबाबत पोलिसांनी दखल घेऊन कारवाई न केल्यास याबाबत गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार करू, असा इशाराही अनिल भाईदास पाटील यांनी दिला.
उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांना दिले निवेदन

   मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर व्यापारी बांधवांनी अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांना निवेदन दिले व गुन्हेगारांवर कारवाई मागणी केली. 
जिल्हा पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी पाहणी 
       आज दुपारी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी घटनेची दखल घेऊन अप्पर पोलीस अधिक्षकांसह अमळनेरला येऊन  घटनास्थळाची पाहणी केली व तपासकामी महत्वाच्या सुचना केल्या.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे व पोलीस निरीक्षक अंबादास मोरे साहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर व शरद पाटील,रवी पाटील,हितेश चिंचोरे उपस्थित होते. इतर जिल्ह्यातील पोलीस विभागासही घटनेची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सक्षम अधिका-यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांची चार पथके तयार केली असून   नाकेबंदी करून गुन्हेगारांच्या तात्काळ मुसक्या आवळण्याचा अल्टीमेटम पोलीस अधिक्षकांनी पोलीसांना दिला आहे.
दोन अज्ञात व्यक्तीविरोधात  गुन्हा दाखल
सदर घटनेसंदर्भात अजय बितराई यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञात व्यक्तीविरोधात अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.