अमळनेर - येथील लायन्स क्लब, आधार बहुउद्देशीय संस्था अंमळनेर व ग्रामीण रुग्णालय अमळनेर तर्फे भव्य कॅन्सर शिबिराचे आयोजन येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले होते. या शिबिरात ३५६ रुग्णांची तपासणी जळगाव येथील सुप्रसिद्ध कँसर तज्ञ डॉक्टर नीलेश चांडक, डॉक्टर श्रध्दा चांडक,व अमळनेर येथील डॉक्टर रवींद्र जैन इतर सहकारी डॉक्टरांनी केली. त्यात मुख्य म्हणजे स्त्रियांमधील स्तनाच्या गाठीची व गर्भाशय मूखाच्या ११२ महिलांची पैप स्मिअर तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी डॉ. प्राजक्ता बहुगुणे,डॉ.हिरा बाविस्कर व डॉ. मनीषा भावे यांनी सहकार्य केले. ज्या रुग्णांना एक्स-रे सोनोग्राफी व इतर तपासणीची गरज होती त्यांना सुद्धा सदरच्या तपासणी मोफत करून देण्यात आल्या. तसेच ज्या रुग्णांना ज्या सर्जरीची आवश्यकता होती त्यांना जिल्हा रुग्णालयात पुढील तपासणी व सर्जरी करिता पाठवण्यात आले. संशयित रुग्णाची बायोप्सी तपासणी शिबिरादरम्यान करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन जळगावचे सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. निलेश चांडक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी डॉ.चांडक व डॉ.चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अमळनेर येथील लायन्स क्लबच्या सदस्या डॉ.मंजिरी कुलकर्णी यांचे ऑल इंडिया लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार लायन्स क्लबचे अध्यक्ष नीरज अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला लायन्स क्लब अमळनेरचे सर्व सदस्य, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भारती पाटील, कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद व त्यांची संपूर्ण टीम तसेच ग्रामीण रुग्णालय अमळनेरची पूर्ण टीम त्यात प्रामुख्याने डॉ.ताडे,डॉ.जी.एम.पाटील,डॉ. संचेती,समुपदेशक अश्वमेध पाटील,जयेश मोरे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्रीमती भारती पाटील यांनी केले.
-------------------------------------------------------------------------------



