अमळनेर - भुसावळ जंक्शन ते वांद्रे टर्मिनस व्हाया उधना ही खान्देश एक्सप्रेस दररोज सुरू करण्याबाबत अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी आज महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. याबाबत येत्या गुरुवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पश्चिम रेल्वेचे व मध्य रेल्वेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांची आपल्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सध्या आठवड्यातून एका बाजूने तीन फे-या
वेळापत्रकानुसार खान्देश एक्सप्रेस ही वांद्रे टर्मिनल ते भुसावळ जंक्शन पर्यंत मंगळवार, गुरुवार व शनिवार असे तीन दिवस सुटते तसेच भुसावळ जंक्शन ते वांद्रे टर्मिनस येथूनही मंगळवार, गुरुवार व शनिवार याप्रमाणे तीन दिवस सुटते.
प्रवाशांची मागणी
जळगाव, धुळे तसेच नंदुरबार जिल्हयातून अनेक प्रवाशांनी याबाबत मागणी केलेली आहे. खान्देश एक्सप्रेस ही वांद्रे टर्मिनस व भुसावळ जंक्शन येथून दररोज सुटावी जेणेकरुन सर्व सामान्य प्रवाशांना तसेच खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्हयामधून आमदार व खासदार सुध्दा या रेल्वेने प्रवास करतात. यासाठी खान्देश एक्सप्रेस भुसावळ जंक्शन व वांद्रे टर्मिनस ही एक्सप्रेस रेल्वे येथून दररोज सुटावी. जेणेकरुन सर्वसामान्य प्रवाशांना व आमदार,खासदार यांनाही या रेल्वेने येण्या जाण्यासाठी सोय उपलब्ध होईल याबाबतची मागणी आ.अनिल पाटील यांनी केली आहे.



