घरात शौचालय नसल्यास होणार कठोर कारवाई गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांचे आवाहन

अमळनेर -
तालुक्यातील सर्व गावे हागणदारी मुक्त करण्यासाठी पं.स.चे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्या नेतृत्वात पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी कसोशीने प्रयत्न करत आहेत. प्रबोधन,कायदेशीर कारवाई या वेगवेगळ्या मार्गाने वैयक्तिक शौचालयाचा वापर करावा असा आग्रह प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.या अभियानाचा पुढील टप्पा म्हणून गटविकास अधिकारी श्री वायाळ यांनी ग्रामपंचायतींना सूचित केले आहे की अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारी मुक्त करण्यासाठी सर्व कुटुंबांकडे शौचालय असणे बंधनकारक आहे. जी घरे भाड्याने दिली आहेत,परंतु त्यांच्याकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही अशा घरांमध्ये शौचालयाची सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात संबंधित घरमालकांना आदेशित करावे. पंधरा दिवसांत जर संबंधितांनी शौचालयाची सोय उपलब्ध केली नाही तर ग्रामसभा व मासिक सभेत ठराव करून संबंधित घर सील करण्यात यावे. नवीन घराची नमुना नंबर ८ ला नोंद करताना घरात शौचालय असल्याची खात्री करूनच नोंद करण्यात यावी. सर्व ग्रामपंचायतींनी ३१ मार्च पर्यंत थकबाकीसह १००% घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली करावी असे आदेश श्री वायाळ यांनी दिले  असून घरपट्टी व पाणीपट्टी भरल्या शिवाय पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या कुठल्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही याची सर्व नागरिकांनी  गांभीर्याने नोंद घ्यावी असे आवाहन नागरिकांना केले आहे.
तालुक्यातील ४ ग्रामपंचायती १००% हागणदारी मुक्त
     अमळनेर तालुक्यातील एकतास मेहेरगाव सुंदरपट्टी व दहिवद या  ४ ग्रामपंचायती १००% हागणदारी मुक्त झाल्या आहेत. या चारही गावातील सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य,
ग्रामसेवक व सर्व ग्रामस्थांचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी अभिनंदन केले आहे. 
३१ मार्च पर्यंत घरकुलाचे काम पुर्ण करावे-आवाहन
     अमळनेर तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आली आहेत. त्यांनी आपल्या घराचे बांधकाम दि.३१ मार्च पर्यंत पुर्ण करावीत. जर काम पुर्ण झाले नाही व त्यांना घरकुलाचे अनुदान मिळण्यास काही अडचणी आल्यास पं.स.जबाबदार रहाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी असेही गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी कळविले आहे.
----------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.