अमळनेर - शहराच्या आठवडे बाजारातील एका मोबाईल दुकानातून चोरट्यांनी दोन मोबाईल व ५०० रुपये लांबवल्याची घटना नुकतीच घडली. ही घटना दि. १ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.
शहरातील आठवडे बाजारात बादल घनश्याम पंजवाणी यांचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. या दुकानातून अज्ञात चोरट्याने दुकानाचा कडी कोंडा तोडून रोख रक्कम पाचशे रुपये व सहा हजार दोनशे रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना दि.१ रोजी पहाटे ३ वाजेदरम्यान घडली. पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुनील हटकर करीत आहेत.
संगम मोबाईल येथेही चोरी
न्यु प्लॉट परिसरातील खड्डा जीन जवळ असलेल्या संगम मोबाईल चे आकाश कुकरेजा यांचा दुकानातही ४- ५ दिवसापूर्वी चोरी झाली होती. सुमारे २० हजार रूपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तर त्याच दरम्यान भागवत रोड वरील काही दुकानात चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला असल्याची चर्चा आहे. याबाबत पोलीसात तक्रार दाखल नसल्याचे समजते.
पोलीस निरीक्षकांचे आवाहन
अमळनेर शहर व परिसरात मागील काही दिवसात चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. पण दुकानदार अथवा रहिवासी या बाबतीत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिक व व्यापारी बांधवांनी असे न करता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी जेणेकरून गुन्ह्याचा तपास लावणे सोपे होईल असे आवाहन पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी व्यापारी बांधवाच्या सभेत केले आहे.
-----------------------------------------------------------------------------




