अमळनेर - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने येथील प्रताप तत्वज्ञान केंद्रात विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी सुरू केलेले विद्यार्थी सुविधा केंद्र अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचा असल्याने सदर विद्यार्थी सुविधा केंद्र पुन्हा सुरू करावे अशी मागणी अभाविपने केली आहे. या मागणीचे निवेदन प्राचार्य डॉ. ज्योती राणे यांना देण्यात आले.
विद्यापीठाने विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परिक्षा,प्रवेश व पात्रता या विषयातील काही सुविधा स्थानिक पातळीवर मिळाव्यात यासाठी येथील प्रताप तत्वज्ञान केंद्रात विद्यार्थी सुविधा केंद्र सुरू केले होते. विद्यार्थ्यांना महत्वाच्या सुविधा या केंद्रात मिळत असल्याने त्यांची वेळेची व आर्थिक बचत होत होती.या केंद्राचा विद्यार्थ्यांना खुपच फायदा होत असे. अशाच प्रकारची सुविधा केंद्र अन्य तीन ठिकाणीही सुरू करण्यात आली होती. पण विद्यापीठाने दि.१ फेब्रुवारी पासुन सर्वच सुविधा केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.आता विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापीठाशी संबंधित कामासाठी विद्यापीठात अथवा सायबर कॅफेत जावे लागेल. जादा पैसे देऊन सुविधा मिळवून घ्याव्या लागतील. सुविधा केंद्र बंद करण्याच्या हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अतिशय गैरसोयीचा असून विद्यापीठाने बंद केलेली विद्यार्थी सुविधा केंद्र विद्यार्थी हिताचा विचार करून पुन्हा सुरू करावीत अशी मागणी अभाविपच्या वतीने करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ. ज्योती राणे यांना निवेदन देऊन आपल्या स्तरावरुन या मागणी संदर्भात कार्यवाही करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी अभाविपचे केशव पाटील,नरेंद्र देसले,कृष्णा साळुंखे,रोहन शिंपी,कल्पेश पाटील,सागर चौधरी,पुनम पाटील,गायत्री पाटील,धनश्री महाजन,किर्ती सोनार,वैष्णवी अमृतकार,रविंद्र मोरे,सचिन पाटील आदींसह कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यापीठाने सर्वच विद्यार्थी सुविधा केंद्र पुन्हा सुरू करावीत या मागणीसाठी अभाविपचे पदाधिकारी कुलगुरूंची भेट घेणार आहेत.



