-----------------------------------------------------------------------
अमळनेर - आज संपूर्ण जगाला भेडसावणारी समस्या म्हणजे "कोरोना व्हायरस " हा आजार ठरत आहे. कोरोना ला रोखण्यासाठी शासन-प्रशासन,स्वयंसेवी संस्था सर्वच जण युध्दपातळीवर कामास लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.२२ मार्च रविवार रोजी संपूर्ण देशभर "जनता कर्फ्यु" पाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनास जनतेचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळणार असल्याचे दिसून येत आहे. अमळनेर शहर व तालुक्यातही जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे. "कोरोना" ला हरवण्यासाठी अमळनेरकरांना सज्ज झाले आहेत. लोकप्रतिनिधींचे आवाहन
कोरोना व्हायरस आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी जनतेस प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे व ज्या कार्यक्रमात अधिक गर्दी होतील असे कार्यक्रम आयोजित करू नयेत असेही आवाहन आ.अनिल भाईदास पाटील व आ.स्मिताताई उदय वाघ यांनी केले आहे. तसेच दि.३१ मार्च पर्यंत जाहीर कार्यक्रमांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय दोन्ही आमदार व इतर मान्यवरांनी जाहीर केलेला आहे.
फक्त अत्यावश्यक सेवा सुरू
प्रत्येक व्यक्तीने दि.२२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या कालावधीत आपल्या घरातच थांबायचे आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसारास थांबविण्यासाठी मानवी संपर्क रोखणे हा महत्वाचा उपाय ठरणार आहे. हा जनता कर्फ्यु यशस्वी करण्यासाठी बाजारपेठ, भाजी बाजार,एस.टी.व खाजगी वाहतूक सेवा, व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. याआधीच शाळा,
महाविद्यालयांना सुटया जाहीर करण्यात आल्या आहेत. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार आहेत. आजचा जनता कर्फ्यु कमालीचा यशस्वी होणार असल्याचे जनमानसातील चर्चेतून दिसत आहे.
उद्या पासून जिल्हा लॉक डाऊनचे आदेश
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी काल रात्री दि.२३ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाउनचे आदेश काढले आहेत. हे आदेश मात्र जीवनावश्यक वस्तू व सेवा, भाजीपाला बाजार,दवाखाने,औषधालय यांना लागू राहणार नाही.
ही दुकाने असतील बंद
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात उद्या दिनांक २३ मार्चपासून सोने-चांदीचे दुकाने,खेळण्याची दुकाने,
हॉटेल,सर्व ढाबे, इलेक्ट्रॉनिक दुकाने, झेरॉक्स दुकाने, फोटो स्टुडिओ, खाद्यपदार्थांच्या गाड्या, वडापाव,अंडा बिर्याणी गाड्या, आईस्क्रीम पार्लर,आईस कँडीची दुकाने,ब्युटी पार्लर,सलूनची दुकाने,वॉटर पार्क, खेळाची ठिकाणे, फटाका दुकान व इतर तत्सम दुकाने दिनांक २३ मार्च पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तू औषधालय,भाजीपाला विक्री, अंत्यविधी यांना लॉक डाऊनचा नियम लागू राहणार नाही.
No comments
Post a Comment