--------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------
अमळनेर - मागील महिन्यात कोरोना आजाराचा असलेला प्रादुर्भाव रोखण्यात आपला तालुका यशस्वी ठरला तरीही आपण पूर्णपणे कोरोना मुक्त झालो असे नाही. अद्यापही काही रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच संभाव्य काळातील धोका लक्षात घेता जनतेने काही नियमांचे पालन करावे यासाठी शासन वारंवार आवाहन करीत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून शासनास सहकार्य करावे असे आवाहन अमळनेरचे तहसिलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे. तर शासन निर्देशांचे उल्लंघन केल्यास दुकानदार यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नपाच्या अतिक्रमण पथकाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी सांगितले आहे. नियमांचे उल्लंघन करणा-या काही दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. नियम पाळा,सहकार्य करा
संपूर्ण देशात अजूनही लॉकडाऊन सुरू आहे. शासनाने जारी केलेल्या नवीन निर्देशानुसार अमळनेर नॉनरेड झोन मध्ये येत आहे. त्यामुळे काही नियम शिथील करून दुकानदारांना दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण यातही सोशल डिस्टन्सींग,घराबाहेर पडतांना मास्क किंवा रूमालाचा वापर करावा,सार्वजनिकठिकाणी
थुंकण्यास निर्बंध,दुकाने उघडणे व बंद करण्याच्या निर्धारित वेळा यांचे पालन करावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. संभाव्य धोका टाळायचा असेल तर नागरिकांनी या नियमांचे पालन करावे व शासनास सहकार्य करावे. सध्या बाजारात होत असलेली गर्दी काळजी वाढविणारी आहे.वाहन चालवतांना सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वच नियम कसोशीने पाळले पाहिजे.महत्वाचे काम असल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. सायंकाळी ५ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही दुकान सुरू ठेऊ नये अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल.तरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे व सहकार्य करावे.
*- मिलिंद वाघ*
तहसिलदार,अमळनेर
नियमांचे पालन नाही,मग कठोर कारवाई
अमळनेर शहरातील नागरिक व दुकानदार यांच्यासाठी शासनाने निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार व्यावसायिकांनी आपली दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेतच सुरू ठेवावीत.दुकानात सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे,सॅनिटायजरचा वापर करावा,घराबाहेर फिरतांना मास्क किंवा रूमालाचा वापर करावा व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये या नियमांचे उल्लंघन करतांना आढळून आल्यास कमीत कमी ५०० रुपय पासून ते नियमानुसार योग्य त्या रक्कमेचा दंड व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नपाच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी पथक कार्यरत आहे. हे पथक बाजार परिसरात उपस्थित राहून नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करीत असते. मागील काही दिवसात अशा दुकानदारांवर नपाने कारवाई केली आहे व पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तरी व्यावसायिकांनी सायंकाळी ५ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा (दवाखाना व मेडिकल) वगळता कोणतेही दुकान सुरू ठेऊ नये असे आम्ही कळकळीचे आवाहन करीत आहोत.
*-राधेश्याम अग्रवाल*
अतिक्रमण पथक प्रमुख
न.पा.अमळनेर






