अमळनेर - कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने स्थानिक पातळीवर जनता कर्फ्यु पाळण्यात आला आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय व रोजगार बंद असल्याने सर्वसामान्य परिवार आर्थिक संकटात सापडले आहेत. लॉकडाऊनमुळे २ महिन्यापासून रिक्षा जागेवर उभ्या आहेत, हातावर पोट भरणारे रिक्षा चालक यांच्या मदतीला तालुक्यातील लोकप्रतिनिधी,शासन व उदार दाते येतील याची रिक्षा धारक वाट पहात होते परंतु कुणीही फिरकले नाही. अखेर सभासदांनी दरमहा दहा वीस रुपये यथाशक्ती जमा केलेल्या आपत्कालीन स्वनिधीतून सुभाष चौक रिक्षा युनियनच्या सर्व सभासदांना पीठ, मीठ,तेल,डाळी,साबण,चहा व साखर असा किराणा वाटप करण्यात आला. सुमारे ७० सभासदांना याचा लाभ मिळाला.

युनियनच्या सभासदांनी जमा केलेली रक्कम या संकटकाळात सभासदांना कामात आली. या उपक्रमासाठी अध्यक्ष किशोर आनंदा पाटील, उपाध्यक्ष आनंदा वसंत पाटील, खजिनदार कृष्णा देविदास पाटील आदींनी या कामी परिश्रम घेतले.
सामाजिक उपक्रमात सहभागी,संकटकाळात मदतीची अपेक्षा
सुभाष चौक रिक्षा युनियनच्या वतीने सॅनिटायझर वाटप, फवारणी असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. सामाजिक कामात सतत सहभाग घेणाऱ्या आमच्या युनियनच्या सभासदांकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधी,दाते व शासनाने लक्ष दिले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे.
*-किशोर पाटील,* अध्यक्ष
सुभाष चौक रिक्षा युनियन
