अमळनेरात लॉकडाऊन नियमात सवलत, काही भाग वगळता शहरातील व्यवसाय उद्यापासून पूर्ववत सुरू तहसिलदार मिलिंद वाघ यांनी जारी केली नवीन नियमावली

Friday, May 22, 2020

/ by Amalner Headlines

-------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------
अमळनेर -
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देशात  लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. मागील सुमारे पावणे दोन महिन्यांपासून सर्व व्यवसाय  बंद आहेत. शासनाने दिलेल्या नवीन आदेशानुसार देशात काही भागात नियमात सवलत देण्यात येत आहे. अमळनेर तालुक्यातील
 व्यवसाय आजपासून (दि.२३) सुरू करता येणार आहेत. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या ४ थ्या भागात त्या-त्या भागातील विद्यमान परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल पाटील यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी चर्चा केली. त्यात आजपासून अमळनेर शहर व्यावसायिकांना खुले करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. फक्त अमळनेर शहरातील पॉझिटीव्ह रूग्णाचा परिसर वगळता इतर सर्व शहर प्रशासनाने दिलेल्या नियमांचे अधिन राहून खुले करण्यात येत असल्याचे निर्देश तहसिलदार मिलिंद वाघ यांनी जारी केले आहेत.
       याबाबत तहसिलदारांनी  जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, आता शासनाने इतर झोन वगळून केवळ रेड व नॉन रेड झोन असे दोनच भाग केले आहेत.जळगाव जिल्ह्यात महापालिका क्षेत्र हे रेड झोनमध्ये आहे तर उर्वरित जिल्हा नॉन रेड झोन घोषित करण्यात आला आहे. रेड झोनमध्ये पुर्वीसारखेच निर्बंध लागू रहातील. तेथील  नागरिकांना त्या क्षेत्राबाहेर ये-जा करण्याची परवानगी मिळणार नाही. तर वैद्यकीय अधिकारी व अन्य कोरोना योद्धा यांना या भागात येता येईल. याव्यतिरिक्त इतर भागातील सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू रहातील,जनतेने व दुकानदारांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. मास्क/रूमाल व सॅनिटायजरचा वापर करावा, दुकानदार व ग्राहक यांच्यात ६ फुट इतके अंतर ठेवावे, नागरिकांनी एकाच वेळी व एकाच ठिकाणी गर्दी करू नये,अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, दुकानात एका वेळी फक्त ५ व्यक्तींना प्रवेश द्यावा,सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे व थुंकणे हा गुन्हा आहे,तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,नियमांचे उल्लंघन होत असेल तर ते दुकान तात्काळ बंद करण्यात येईल,तसेच नागरिकांनी वाहतुकीच्या बाबत दिलेल्या सुचनांचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसिलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे.
 
आर्सेनिक अल्बम-३० औषधाचे रेड झोनमध्ये वाटप
      कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रतिकार क्षमता वाढ करणारे आर्सेनिक अल्बम-३० या औषधांचे शहरातील कॅन्टोनमेंट झोन असलेल्या भागात वाटप करण्यात आले. १५० आरोग्य स्वयंसेवकामार्फत सुमारे ७ हजार कुटुंबांसाठी हे औषध देण्यात आले अशी माहिती देण्यात आली आहे.
------------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines