-------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. अमळनेर नगर परिषदेने तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड करण्यात येईल असा आदेश दिला आहे. आज या निर्णयाचा दणका नपाच्या अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांना बसला. तसेच दुकानात सोशल डिस्टन्सींगचे पालन न केल्याप्रकरणी दोन दुकान मालकांना दंड करण्यात आला आहे. आज सकाळी मुख्याधिकारी, तहसिलदार यांच्या समवेत कामावर असतांना राधेश्याम अग्रवाल हे सार्वजनिक ठिकाणी थुंकले आणि ही बाब मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांच्या लक्षात येताच त्यांनी राधेश्याम अग्रवाल यांना ५०० रुपये दंड ठोठावला. या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली असून या कारवाईचा फटका कुणालाही बसू शकतो याची धास्ती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे ही अनिष्ठ बाब टाळावी असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तरीही नागरिकांमध्ये सुधारणा होतांना दिसत नाही ही चिंताजनक बाब आहे. कायदेशीर कारवाईचा दणका बसला तर त्या भितीपोटी तरी लोक सुधारतील अशी अपेक्षा व्यक्त करणे हितावह ठरेल. आजही जनतेला मास्क किंवा रूमालाचा वापर करा असा आग्रह प्रशासनाला वारंवार करावा लागत आहे. सर्वच नागरिकांकडे मास्क किंवा रूमाल आहेच. पण आपल्या सुरक्षेसाठी याचा नियमित वापर करण्याचे भान काही सुशिक्षित लोकही हरवून बसले आहेत. घराबाहेर पडतांना मास्क किंवा रूमालाचा वापर करावा व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये या दोन गोष्टींचे जरी पालन केले तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. संबंधित विभागाने याकडेही लक्ष देऊन जनजागृती सोबतच कठोर कारवाईही करावी असे जनतेत बोलले जात आहे.
सोशल डिस्टन्सींगचे उल्लंघन
लॉकडाऊनमध्ये सवलत देऊन दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज पहिलाच दिवस होता. शासनाने दिलेल्या सुचनांचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन करण्यात आले होते. पण आज उज्वल कलेक्शन व रामा ड्रेसेस या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सींगचे पालन होत नसल्याने त्यांना अनुक्रमे रूपये १०००/- व ५००/- असा दंड करण्यात आला आहे
No comments
Post a Comment