---------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हातमजुर,सलून व्यावसायिक,ऑटो रिक्षा चालक, खाजगी वाहन धारक,हॉटेल व्यावसायिक यासह बँड व्यवसायात कारागीर म्हणून काम करणाऱ्यांना लॉकडाऊनचा फार मोठा फटका बसला आहे.त्यातच ज्या बँड मालकांकडे आपण इमाने इतबारे काम करतो त्या बँड मालकांनीही आम्हाला वाऱ्यावर सोडत लॉकडाऊन काळात आम्हा कारागिरांना मदत न करता उलट पुढच्या वर्षी तुम्हाला आमच्याकडे फुकट काम करावे लागेल असे बँड मालक धमकावीत असल्याची लेखी तक्रार पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्याकडे कारागिरांनी केली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर मधील असंख्य कारागीर हे दरवर्षी चार महिन्याकरिता बँडमध्ये काम करत असतात.तसा बँड मालक कारागिरांकडून करारही करून घेत असतो. यंदा ही २०२० मध्ये बँड मालकांनी कारागिरांना ४ महिन्यांकरिता करार करून कामावर ठेवले.नोव्हेंबर ते मार्च पर्यंत कारागिरांनी आपापल्या बँड पथकामध्ये इमाने इतबारे वाजंत्री वाजविण्याचे काम करीत राहिले.
नंतर २३ मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे लग्न सराई रद्द झाली व बँड मालकांसह कारागीर ही घरीच बसले.महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातही कोरोनाचा शिरकाव होणे ही एक नैसर्गिक बाब असून ,लॉकडाऊन मुळे सर्व बँड कलावंत बेरोजगार झालेत.
त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.करारानुसार जून पर्यंत कारागिरांनी बँड मालकांकडे काम करणे अपेक्षित होते.परंतु लॉकडाऊनमुळे लग्न सराईच रद्द झाल्याने मार्च पर्यंत कारागिरांनी काम केले.
कारागीर बेरोजगार झाल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले. दरम्यान काही कारागीर बँड मालकांकडे उर्वरित रक्कम मागण्यासाठी व हिशेब करण्यासाठी गेले असता संबंधित बँड मालकांनी त्यांना काहीच आर्थिक मदत दिली नाही व हिशोबही केला नाही. शिवाय उलट पुढच्या वर्षीही तुम्हाला २ महिने फुकट काम करावे लागेल असे धमकावित असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशा पद्धतीने बँड मालकांकडून आमच्या कारागिरांवर होणाऱ्या अन्यायापासून वाचवावे अशी तक्रार बॅड कारागिरांनी अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्याकडे केली आहे.
चौकशी नंतर योग्य न्याय दिला जाईल - श्री मोरे
अर्जाची चौकशी करून कारागिरांना योग्य तो न्याय दिला जाईल असे आश्वासनही यावेळी श्री अंबादास मोरे यांनी अर्ज देण्यास आलेल्या संबंधितांना दिले.
यांच्या आहेत सह्या
या तक्रार अर्जावर समाधान बिऱ्हाडे,कांतीलाल गरुड,संतोष चंदनशिव,सलमान पठाण,रमेश विसावे,प्रशांत शिरसाठ, रावसाहेब चंदनशिव,सागर गरुड़
किशोर गरुड़,विजय मोरे,रामा चंदनशिव,चुणीलाल मोरे,विकी अंभोरे आदींच्या सह्या आहेत.
No comments
Post a Comment