----------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यातील महिला बचत गटांची चळवळ आता सक्षमपणे उभी रहात आहे. केवळ पैशाच्या व्यवहारात नाही तर जीवनात दैनंदिन व्यवस्थापनात आवश्यक गोष्टींचे नियोजन करण्यात त्या पुढाकार घेत आहेत. ग्रामीण व शहरी भागातही महत्वाचा प्रश्न म्हणजे स्वच्छता. या प्रश्नावर अमळनेर पंचायत समितीने महिला बचत गटांच्या माध्यमातून मार्ग काढला आहे व त्यात यशही आल्याचे दिसून येत आहे. या रणरागिणींनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळेच तालुका हागणदारी मुक्त झाला आहे असे मत पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी व्यक्त केले आहे.गावात जाऊन जनजागृती
तालुका अभियान समन्वयक श्रीमती सिमा रगडे,तालुका समन्वयक श्रीमती ज्योती भावसार आणि श्रीमती राणी इंगळे यांनी गावागावात जाऊन महिलांचे मेळावे घेऊन ग्रामीण भागातील महिलांनी शौचालयाचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती केली. अमळनेर तालुक्यातील एकूण ९० गावांमध्ये ११५६ महिला बचत गट असून तालुक्यातील ग्रामीण भागातील १२००० महिला या उमेद अभियानाच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. अमळनेर तालुक्यात बचत गटांचे ५० ग्रामसंघ असून एक प्रभाग संघ स्थापण करण्यात आला आहे. तालुक्यातील ५० ग्रामसंघापैकी ३५ ग्रामसंघांना स्टार्टअप काॅस्टमधून ५५००० रूपये मिळाले असून त्यामाध्यमातून त्यांचे स्वतंत्र कार्यालय उभारण्यात आले आहे. तालुक्यातील १७० महिला उमेद अभियानाच्या माध्यमातून पशुसखी,कृषीसखी,समुदाय संघटीका,बँक सखी ,आर्थिक साक्षरता सखी,वर्धिनी ग्रामसंघ लिपिका म्हणून अडीच हजार रूपये मानधनावर कार्यरत असून त्यांना नेमून दिलेली जबाबदारी अत्यंत चांगल्या पध्दतीने पार पाडत आहेत.
महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न
सन २०१९-२० या आर्थिक वर्षात तालुक्यातील ११५६ बचत गटांपैकी ४२५ बचत गटांना प्रत्येकी दोन लाख रूपये याप्रमाणे कर्जपुरवठा केलेला असून अजूनही १५० कर्ज प्रकरणे बँकांमध्ये प्रलंबित आहेत.लाॅकडाऊनच्या काळात कर्जपुरवठा होण्यामध्ये अडचण येत असली तरी वैयक्तिक पातळीवर बँकांकडे सतत पाठपुरावा आहे. तालुक्यातील सर्व बचत गटांना कर्ज मिळवून देण्याचा मानस असून त्यासाठी बँकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
लॉकडाऊन काळातही रोजगार
अमळनेर तालुक्यातील बचत गटांनी लाॅकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात मास्क विक्री केल्यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींनी बचत गटांकडूनच मास्कची खरेदी केल्यामुळे महिलांना अडचणीच्या काळात हातभार लागला आहे.
गरजूंना नाममात्र दरात कर्जपुरवठा
..ग्रामसंघात येणा-या अतिजोखीम प्रवणता निधीमधून तालुक्यातील गोवर्धन,हेडावे आणि देवगाव देवळी या गावांमध्ये गरजू बेरोजगार लोकांना अन्नधान्य,
किराणा,आरोग्य,स्वच्छता या बाबींसाठी नाममाञ व्याजदराने २१६००० रूपये इतका कर्जपुरवठा केला असून यामुळे अडचणीच्या काळात संबंधितांना मदत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
इतर उपक्रम उल्लेखनीय
तालुक्यातील नगाव बुद्रुक येथे प्रदर्शनीय परसबाग बनवण्यात आलेली असून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये तीन परसबागा तयार करण्याचे नियोजन केले असून त्या माध्यमातून सांडपाणी व्यवस्थापन करण्याचा मानस आहे.
पंडीत दिनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजने अंतर्गत १४० मुलामुलींनी वेगवेगळ्या कंपन्याकडून प्रशिक्षण दिले असून ११० जणांना नोकरी मिळाली आहे.
उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला दुध व भाजीपाला विक्री करणे,गोधडी शिवणे,पायपुसणी बनवणे,पापड व लोणचे बनवणे,झाडू व टोपली बनवणे,पुरणपोळी व शेवया बनवणे या माध्यमातून रोजगार मिळवत असून स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून कुटुंबाला गरीबीच्या खाईतून वर काढण्यासाठी परिस्थितीशी एखाद्या रणरागिणी प्रमाणे संघर्ष करत आहेत.
अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील १५०० बचत गटांच्या महिलांनी स्वच्छतादूत म्हणून काम केलेले असून हागणदारी मुक्तीसाठी त्यांनी दिलेले योगदान न विसरण्या सारखे आहे. अमळनेर तालुक्यातील बचत गटाची चळवळ श्रीमती सीमा रगडे,श्रीमती.ज्योती भावसार व श्रीमती राणी इंगळे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असून या अभियानाला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. बी.एन.पाटील व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्री. प्रभाकर शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभत असून भविष्यात तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ही चळवळ पोहोचविण्यासाठी अमळनेर पंचायत समितीतील अधिकारी व पदाधिकारी प्रयत्नशील राहणार आहेत असेही सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी सांगितले आहे.
No comments
Post a Comment