सलुन व्यावसायिक व टॅक्सी धारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आ.अनिल पाटील घेणार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट

-------------------------------------------------------------------------
            - * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------------
अमळनेर -
कोरोनामुळे मागील तीन महिन्यापासून देशातील सलुन व्यावसायिकांची दुकाने पूर्णपणे बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच टॅक्सी धारकांना व प्रवासी वाहतूक करणा-यांना प्रवासी संख्या वाढविता येऊ शकते का याबाबतही चर्चा करून निर्णय होणे आवश्यक आहे. हे दोन्ही  व्यवसाय पुन्हा  सुरू करण्यासंदर्भात प्रयत्नशील असून  योग्य मार्ग काढावा यासाठी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आ. अनिल पाटील हे लवकरच मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेणार आहेत.
            यासंदर्भात अधिक माहिती देताना आ पाटील म्हणाले की देश व राज्यात कोरोना सारख्या भयंकर आजाराचा शिरकाव झाल्याने दि.२२ मार्च पासून लॉक डाऊन पाळण्यात येत आहे.लॉकडाऊन चा कालावधी तीन महिन्यांच्या वर झाला असतांना शासनाने दरम्यानच्या काळात लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणत अत्यावश्यक सेवा व इतर व्यवसायांची दुकाने व उद्योग सुरू केले आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपुर्ण राज्यात सलुन व्यवसायास परवानगी नाकारली असल्याने सामान्यांचा हा व्यवसाय अजून सुरू होऊ शकला नाही,यासाठी राज्यात नाभिक संघटनेने आंदोलनाचाही पवित्रा घेतला आहे. मात्र अजूनही त्यांचा प्रश्न सुटू शकलेला नाही. मात्र व्यवसाय पूर्णतः बंद पडल्याने त्यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकदा त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याकडे येऊन व्यथाही मांडल्या आहेत,परंतु शासनानेच परवानगी दिली नसल्याने स्थानिक पातळीवर आपण काहीही करू शकत नाही,यासाठी त्यांचा प्रश्न शासन दरबारी मांडण्याचा निर्णय मी घेतला आहे.नाभिक व्यावसायिकांना परवानगी दिल्यास सोशल डिस्टनसिंगसह इतर आवश्यक ती काळजी व नियम पाळण्याची तयारी त्यांनी दाखविलीही आहे.यामुळे नियम पाळण्याच्या अटीवर प्रायोगिक तत्वावर काही दिवस परवानगी देऊन पहावी आणि नियम पाळून व्यवसाय होत असल्यास पुढील परवानगी द्यावी अशी विनंती आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे आ.अनिल पाटील यांनी सांगितले.
प्रवासी वाहतुकदारांचाही प्रश्न मांडणार
       शासनाने अनेक निर्बंध उठविताना राज्यातील रिक्षा,टॅक्सी व प्रवासी वाहतुकीच्या वाहनांना वन प्लस टू सीट ला परवानगी दिली आहे,परंतु अमळनेर येथील धुळे,चोपडा,पारोळा टॅक्सी  गाड्यांचा विचार करता आसन क्षमता मोठी असताना त्यांना केवळ दोन सीट घेऊन व्यवसाय करणे शक्यच नाही,त्यातल्या त्यात एस.टी. व रेल्वे सेवा अजून सुरू नसल्याने लोकांचा प्रवास अजूनही थांबला आहे,त्यामुळे टॅक्सीलाही  प्रवासी मिळत नाही आणि आणि पूर्ण टॅक्सीचे भाडे दोनच प्रवाश्यांकडून वसूल करणे शक्य नाही. यामुळे परवानगी मिळूनही ही सेवा अजून सुरू होऊ शकली नाही अशीच परिस्थिती ग्रामिण भागात व्यवसाय करणाऱ्या इतर प्रवासी वाहतुकीच्या वाहन धारकांची झाली असून त्यांनाही दोन प्रवासी घेऊन वाहतूक करणे अशक्य होतं आहे. संपूर्ण राज्यात खाजगी वाहनधारकांची हीच परिस्थिती असताना दोन सीट ऐवजी वन प्लस फोर म्हणजे चार सीटला परवानगी देण्याची मागणी टॅक्सी चालक - मालक  व वाहनधारकांनी केली आहे. हा प्रश्न देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडून याबाबत काही सकारात्मक निर्णय घेता येईल का?याबाबत आपण प्रयत्न करणार असल्याचे आ अनिल पाटील यांनी सांगितले आहे.
--------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.