शहरातील दुकाने आजपासून दररोज सकाळी ९ ते ३ या काळात सुरू राहतील,पण नियमांचे पालन आवश्यक नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई -तहसिलदार मिलिंद वाघ

------------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
---------------------------------------------------------------------------
अमळनेर -
लॉकडाऊन काळात बंद असलेली दुकाने आजपासून निर्धारित वेळेत व नियमांच्या अधीन राहून उघडण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. पण शासनाने ज्या दुकानांना सुरू करण्यास बंदी घातली आहे ती दुकाने उघडता येणार नाहीत असेही तहसिलदार मिलिंद वाघ यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असून उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. येथील बन्सीलाल पॅलेसमध्ये मागील ३ दिवसांपूर्वी व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनची बैठक आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. यावेळी आमदारांनी दुकाने उघडण्याबाबत सूतोवाच केले होते. 
काय आहेत आदेश
      शासनाचे मुख्य सचिव यांनी दि.३१ मे २०२० रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे दुकाने उघडणे बाबत दिलेल्या नियमावलीत म्हटले आहे की,सर्व अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने व ज्या दुकानांना सुरू करण्यास बंदी घातलेली आहे अशी दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने दररोज सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत उघडण्यात यावी, दुकानात  येणारा ग्राहक व स्वतःची सुरक्षा, सोशल डिस्टन्सींग याबाबत सर्वांनी नियम पाळावेत. दुकानदार व ग्राहक किंवा दोन ग्राहक यांच्यात किमान ६ फुट अंतर असले पाहिजे, कुणीही सोशल डिस्टनसिंगचे उल्लंघन करणार नाही याबाबत काळजी घ्यावी,एका वेळी दुकानात फक्त ५ ग्राहकांना प्रवेश द्यावा, त्याचप्रमाणे ग्राहकांना सॅनिटायजर देणे यासह दुकानात येणाऱ्या ग्राहकाला मास्क किंवा रूमालाचा वापर करणे  बंधनकारक आहे. त्याशिवाय कोणीही आपला व्यवसाय करतांना आढळले तर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये,घराबाहेर पडतांना मास्क किंवा रूमालाचा वापर करावा व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये,असे करतांना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल,वाहतूकीचे नियम पाळणे बंधनकारक आहे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. जे दुकानदार वारंवार नियमांचे उल्लंघन करतील त्यांचेवर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल. ५० वर्षावरील जेष्ठ नागरिक व १० वर्षाखालील लहान मुले,गरोदर महिला यांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त (दवाखाना/मेडिकल) घराबाहेर पडू नये. हा निर्णय आजपासून  (दि.७ जून) अंमलात येणार आहे. नागरिकांनी अधिक गर्दी न करता नियमांचे पालन करावे. दुकाने उघडल्याने कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी.
काय असेल बंद
        या कालावधीत शाळा, कॉलेज,प्रशिक्षण केंद्र,व्यायाम शाळा,जीम,कोचिंग क्लासेस, हॉटेल,आईस्क्रीम पार्लर्स, मशीद,मंदीर,समाज मंदीर,मंगल कार्यालय,सलून,ब्युटी पार्लर आदी ठिकाणे बंद राहतील. तसेच सायंकाळी ७ ते सकाळी  ७ वाजेदरम्यान संचारबंदी लागू राहील. तालुक्यातील सर्व नागरिकांनी या नियमांचे पालन करावे व शासनास सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व तहसिलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे.
-------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.