अमळनेर - अयोध्येतील श्री रामजन्मभूमीवर प्रभू श्रीरामचंद्र यांच्या भव्य मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या आनंदोत्सवाचे औचित्य साधत येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व स्थानिक मित्र मंडळाच्या वतीने कोरोना आजारावरील काढ्याचे मोफत वाटप करण्यात आले. शहरात तीन ठिकाणी आयुष काढा वाटपाचे स्टॉल लावण्यात आले होते.
अयोध्येत श्री राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे ही आनंदाची घटना असली तरी सध्या देशात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे अतिशय संयमित पध्दतीने हा आनंद साजरा करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमळनेर व महाराणा प्रताप मित्र मंडळ, श्रीराम चौक मित्र मंडळाच्या वतीने या अभिनव व लोकाभिमुख उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील तहसिल कार्यालयाजवळील महाराणा प्रताप चौक, न्यु प्लॉट मधील एचडीएफसी बॅंक चौक, व स्टेशन रोडवरील श्री राम चौक येथे मोफत काढा वाटपाचे स्टॉल लावण्यात आले होते. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेले घटक असलेला काढा भाविकांना सोशल डिस्टन्सींगचे पालन व मास्कचा वापर करून वाटप करण्यात आला. सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या तीनही स्टॉलमध्ये आधी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात आले.यावेळी सुमारे २४०० व्यक्तींना काढा वाटण्यात आला.

या उपक्रमास जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बजरंगलाल अग्रवाल,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश मुंदडे, संचालक जितेंद्र जैन, तालुका संघचालक डॉ. चंद्रकांत पाटील, नगरसेवक निशांत अग्रवाल यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली. तर यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक,श्रीराम चौक मित्र मंडळ व महाराणा प्रताप मित्र मंडळाच्या सदस्यांनी सहभाग घेतला.
No comments
Post a Comment