अमळनेर - जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना आजाराच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही मेडिकल दुकानदाराने ग्राहकांना डॉक्टरांची औषधे लिहीलेली चिठ्ठी असल्याशिवाय औषधे देऊ नयेत असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जारी केले आहेत. तर अशी संशयित रूग्ण खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी आल्यास त्यांना शासकीय रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवावे असे आदेश अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी लागू केले आहेत.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात आहे की, कोरोनावरील उपचारासाठी रूग्ण अंतिम टप्प्यात कोविड केअर हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे.तोपर्यंत सदर रूग्ण परस्पर मेडिकल दुकानातून सर्दी, खोकला,ताप,डोके दुखणे,फ्ल्यु यासारख्या आजाराची औषधे घेत आहेत. आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रूग्णालयात दाखल झाल्यावर तोपावेतो आजारावरील उपचारास विलंब झालेला असतो.त्यामुळे मेडिकल दुकानदाराने ग्राहकांना परस्पर औषधे न देता डॉक्टरांना भेटण्यास सांगावे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विक्री होत असल्याचे आढळून आल्यास सदर विक्रेत्याविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.
खाजगी डॉक्टरांना सुचना
अमळनेर तालुक्यातील रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाने खाजगी डॉक्टरांसाठी निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार कोरोना आजाराची लक्षणे असलेला रूग्ण आढळून आल्यास त्याला शासकीय रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवावे. त्या रूग्णांची नाव,पत्ता,मोबाईल नंबर ही माहिती रूग्णालयास कळविण्यात यावी. अशा रूग्णाचा स्वॅब घेतला जाईपर्यंत पाठपुरावा संबंधित खाजगी डॉक्टरांनी करावयाचा आहे. जर स्वॅब घेतलेला नाही असे लक्षात आले तर त्याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच अमळनेर शहरासाठी नपाचे मुख्याधिकारी तर ग्रामीण भागासाठी तहसिलदार हे नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. खाजगी डॉक्टरांनी आपल्याकडील संशयित रूग्णांची यादी संबंधित अधिका-यांना द्यावी. एखादा रूग्ण खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेत होता आणि आजाराचे योग्य निदान न झाल्याने किंवा कोविड रूग्णालयात उशिरा दाखल करण्यात आला आणि त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याचे डेथ ऑडीट करण्यात येणार असून त्यात शासकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास इपिडेमिक् अॅक्ट अंतर्गत खाजगी डॉक्टर्स कारवाईस पात्र रहातील असेही उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
No comments
Post a Comment