खेळाडूंसाठी मैदान उपलब्ध करून द्या-आ.अनिल पाटील यांच्या सक्त सुचना क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत अनेक मुद्दयांवर चर्चा

Saturday, October 10, 2020

/ by Amalner Headlines
===================================
          - * जाहीरात * -
==================================
अमळनेर -
कोणताही खेळाडू मैदानापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी. मैदान नसल्याने त्यांच्या करियरचे नुकसान व्हायला नको. खेळाडूंना वापरण्यासाठी योग्य असा ट्रॅक व इनडोअर हॉल दुरूस्ती करून तातडीने उपलब्ध करून द्या अशा सक्त सूचना आमदार अनिल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तालुका क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक दि. ९ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता खान्देश शिक्षण मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
 विधानसभा निवडणुकी नंतर पहिलीच आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्दयांवर चर्चा करण्यात आली.
           बैठकीपूर्वी आमदारांसह अधिकाऱ्यांनी क्रीडा संकुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. तालुका क्रीडा संकुलासाठी सरंक्षण भिंत, ४०० मीटर ट्रॅक,आणि इनडोअर हॉल या कामात ९० लाख रुपये खर्च झाले आहेत मात्र एकही काम पूर्ण झालेले नाही. धावन मार्ग चुकीचा बनवलेला आहे. त्याच्या विटा बाहेर निघालेल्या आहेत. हॉल देखील अपूर्णावस्थेत असून दारे - खिडक्या चोरीला गेल्या आहेत. तर कंपाउंडच्या जाळ्या देखील चोरीला गेल्या आहेत. अंदाजपत्रकाप्रमाणे एक - एक बाब पूर्ण करून त्याचा ताबा जिल्हा क्रीडा विभागाकडे द्यायला पाहिजे होता. बाबनिहाय खर्च देण्यात आलेला नाही. अर्धवट वस्तू व बांधकाम यांचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे असे तालुका क्रीडा अधिकारी सुजाता गुलाने यांनी आढावा सादर करतांना सांगितले. तर जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी सांगितले की धावन मार्ग, खो - खो मैदान, बास्केट बॉल मैदान,कबड्डी मैदान साठी ३० लाख रुपये खर्चाची तरतूद असतांनाही ३० लाखात फक्त धावन मार्ग करण्यात आला आणि तो ही चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे त्याचा ताबा घेऊ शकत नाहीत म्हणून अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित झाला आहे. तर खेळाडूंना वंचित रहावे लागत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावर आमदार अनिल पाटील यांनी ताबडतोब ट्रॅक दुरुस्त करण्याची व्यवस्था करून हॉलच्या बांधकामासाठी लागणारा अपूर्ण निधी मिळवून देतो. तोपर्यंत हॉल देखील वापरण्यायोग्य करा अशा सूचना दिल्या. तसेच क्रीडा संकुलाच्या वाढीव खर्च व अर्धवट बांधकाम पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने ९ कोटी १५ लाख  ७६ हजार रुपयांचा अंदाजपत्रक व आराखडा क्रीडा व युवक सेवा संचालनालयास सादर करण्यात आला आहे. त्यास अद्याप मंजुरी देण्यात आली नाही तर खेलो इंडिया क्रीडा विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रम स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी १० कोटी रुपये अनुदान मंजुरीकरिता प्रस्ताव पाठवण्यासाठी तालुका क्रीडा समितीचा ठराव करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
      या बैठकीस खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश मुंदडा,डॉ संदेश गुजराथी, तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हेमंत महाजन, पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, राजेंद्र चव्हाण,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चंद्रकांत देसले  तालुका क्रीडा समिती सदस्य सुनील वाघ, संजय पाटील, निलेश विसपुते, संजय चौधरी, संदीप पाटील, सुनील गरूडकर, आर.एस.पाटील हजर होते.
=========================================

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines