-----------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यातील अनेक गावात असलेल्या 'ब' सत्ता प्रकारातील मिळकती नजराणा भरून नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून नागरिकांना मिळकत खरेदी - विक्री करतांना येणारी अडचण या निर्णयाने दूर होणार आहे. अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी हा प्रश्न सोडविला आहे. तालुक्यातील अनेक नागरिक या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आमदार अनिल पाटील यांना भेटले होते. गेल्या अनेक वर्षांपासून रहिवास असलेल्या या मिळकती नियमित करण्यासाठी समस्या शासन दरबारी मांडावी असा आग्रह धरला होता. त्यानुसार आमदार अनिल पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन सदर प्रश्न मांडला होता. यावेळी महसूलमंत्री थोरात यांनी संबंधित बाबतीत शासन आदेश पारित करून तालुक्यातील हा प्रश्न मार्गी लावला आहे.
तालुक्यातील अमळनेर शहर,मारवड,पातोंडा,जानवे, मांडळ,जवखेडे, मुडी प्र.डांगरी, वावडे, शिरुड व इतर गावांमध्ये 'ब' सत्ता प्रकारच्या मिळकती मोठया प्रमाणात आहेत. या बाबत तहसिलदार यांनी संबधीत तलाठी यांच्या मार्फत सर्व ब- सत्ता प्रकारातील धारकांना नोटीसा देऊन दंडाची आकारणीसह सरकारी रकमा जमा करण्याबाबत आदेश केले होते. तर आमदार अनिल पाटील यांना या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करुन सदर ब- सत्ता प्रकारातील व अन्य कोणताही सत्ता प्रकार म्हणुन नोंदविलेल्या आणि निवासी, कृषीक,वाणिज्यीक, औद्योगीक प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमीनींचे भोगवटादार वर्ग -१ धारणाधिकारामध्ये रुपांतरण करण्यासाठी दि.१५ मार्च २०२१ रोजी शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
सदर परिपत्रकात नमुद केल्याप्रमाणे नगर भूमापन अधिकारी यांनी त्या गावामध्ये ज्या जमीनीच्या भुधारणा पध्दती आहेत, त्यानुसार त्यांना संबंधीत गाव निहाय अस्तित्वात असलेल्या भुधारणा पध्दतीच्या मर्यादेत अ,ब,क,ड या अदयाक्षरांचा मुक्तपणे वापर करुन अशा नोंदी करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार व सत्ता प्रकार म्हणजे शासनाचे भाडेपट्याने भुईभाडे भरत असलेली जमीन. अशा तसेच अन्य कोणत्याही प्रकारे सत्ता प्रकार म्हणुन नोंदविलेल्या कृषीक, निवासी,वाणिज्य, औद्योगीक, प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमीनीचे महाराष्ट्र जमीन महसुल (भोगवटादार वर्ग -२ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमीन भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणे) नियम २०१९ अन्वये विहीत केलेली कार्यपध्दती अनुसरुन भोगवटादार वर्ग १ / सी-सत्ताप्रकार या धारणाधिकारामध्ये रुपांतरीत करता येईल.या बाबत नागरिकांनी तहसिल कार्यालयात संबधीतांनी आवश्यक त्या पुराव्याच्या कागदपत्रांसह अर्ज करुन विहीत नजराणा रक्कम/ अनार्जित रक्कम भरणे आवश्यक राहिल. वरील परिपत्रकाचे अनुषंगाने ज्या भोगवटादार वर्ग २ च्या धारकाला आपली मालमत्ता भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतरीत करावयाची असल्यास वरील परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
----------------------------------------------------------------
No comments
Post a Comment