आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीत विविध निर्देश
-----------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोना आजाराचा प्रादुर्भाव तीव्र गतीने वाढत असून आपले गाव पुन्हा हिटलिस्टवर यायला नको यासाठी कोरोनाची साखळी तुटलीच पाहिजे. त्यामुळे दि.२० पासून रस्त्यावर वाजणारे डी.जे जप्त करा, वधू-वर पिता यांच्यावरही कारवाई करा, पोलिसांचे चेक पॉईंट लावा, भाजीपाला लिलावातील गर्दी बंद करा,बेजबाबदार समाजकंटकांमुळे जबाबदार नागरिकांना त्रास भोगावा लागत आहे, त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलून कारवाई करावी असे सक्त आदेश आमदार अनिल पाटील यांनी कोरोना आढावा बैठकीत प्रशासनाला दिले. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी आजपासून तीन दिवस अमळनेर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याबाबत प्रशासनास निर्देश देण्यात आले. तर कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दर आठवड्यात शनिवार ते सोमवार असा तीन दिवस लॉकडाऊन लावण्याचे सूतोवाच आ.अनिल पाटील यांनी केले.
बैठकीत दिले निर्देश
येथील पंचायत समितीच्या सभागृहात सर्व प्रशासकीय विभागांची आढावा बैठक काल सकाळी आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी बंद हाताळण्याबाबत सूचना दिल्या. तसेच यावेळी कॉरेन्टाईन रुग्णांवर लक्ष ठेवणे,चाचण्या वाढवणे, कोविड केयर सेंटर अपूर्ण पडल्यास दुसरे सेंटर सुरू करणे, खाजगी रूग्णालयातील स्थिती, बसस्थानकात होत असलेली गर्दी, याबाबत आढावा घेण्यात आला. संचारबंदी बाबत चार अधिकारी नेमण्यात आले असून उद्घोषणा करण्यात येत आहे, बिना मास्क फिरणा-यांवर कारवाई वाढवण्यात येईल, अवैध व जादा प्रवाशी वाहतुकदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी सांगितले. विशेष म्हणजे रेमडेसीयरचा जादा दर घेण्यात येत असेल तर त्या वैद्यकीय सेवाकर्त्यांवर देखील कारवाई करा, नागरिकांनी देखील तहसीलदारांकडे तक्रारी कराव्यात असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले. यावेळी डॉ. गिरीश गोसावी व डॉ. प्रकाश ताळे यांनी लसीची संख्या वाढवून मागितली. केयर सेंटरला डॉक्टर व परिचारिका स्टाफ उपलब्ध करून देत असल्याची माहिती त्यांनी दिली.

बैठकीस यांची उपस्थिती
या बैठकीस आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे,चोपड्याचे प्रभारी प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, डॉ. राजेंद्र शेलकर, डॉ. आशिष पाटील, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, सहाय्यक निबंधक गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हेमंत महाजन, आगार प्रमुख अर्चना भदाणे, हरीश कोळी, पोलीस नाईक डॉ. शरद पाटील, होमगार्ड समादेशक अरुण नेतकर हजर होते.
No comments
Post a Comment