------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------
अमळनेर - शासनाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्हा प्रशासनाने व्यापारी व व्यावसायिकांसाठी दुकाने सुरू ठेवण्याबाबत नियमावली लागू केली आहे. त्यानुसार स्थानिक पातळीवर सायंकाळी ७ वाजेनंतर सुरू रहाणा-या दुकानांवर कारवाई करण्यात येत आहे. पण सदर कारवाई करतांना नपाच्या अतिक्रमण विभागाने आततायीपणा न करता थोडी तरी माणूसकी दाखवली पाहिजे अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे. तर दर आठवड्यात असलेल्या लॉकडाऊन व जनता कर्फ्युबाबत व्यापारी बांधवात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अतिघाई नको माणूसकीची अपेक्षा
अमळनेर शहरात दररोज सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आहे. त्यानंतरही दुकाने सुरू असल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पण सदर कारवाई करतांना नपाच्या अतिक्रमण पथकाकडून अति घाई केली जात असल्याची भावना व्यापारी बांधवांची झाली आहे.
नेमके घडले तरी काय ?
आज काही दुकानदार आपले दुकान बंद करीत असतांनाच अगदी सायंकाळी ७ वाजून २ मिनिटांनी अतिक्रमण पथकाचे प्रमुख व कर्मचारी कारवाईसाठी दाखल झाल्याने काही दुकानदारांचा त्यांच्याशी वाद झाल्याचेही समजते.
नियम पाळतो पण सवलत तर द्या - व्यापा-यांची अपेक्षा
दुकाने बंद करण्याची वेळ नियमानुसार सायंकाळी ७ वाजेची असली तरी माणूसकीच्या दृष्टीने ५ ते १० मिनिटांची सवलत दिली पाहिजे. कारण दुकान बंद करायला वेळ लागू शकतो हे गृहीत धरले पाहिजे अशी अपेक्षा व्यापा-यांची आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नियमांचे पालन करण्यात येथील व्यापा-यांचा नेहमीच सहभाग राहीला आहे.नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करा पण अतिघाई, आततायीपणा न करता वेळप्रसंगी थोडी तरी माणूसकी दाखवली पाहिजे अशी अपेक्षा व्यापारी बांधवांनी व्यक्त केली आहे. या विषयासाठी उपविभागीय अधिकारी, नपाच्या मुख्याधिकारी,नगराध्यक्षा व आमदारांची भेट घेण्याची चर्चा व्यापारी बांधवात जोर धरत आहे.
लॉकडाऊन बाबत .....
प्रशासनाच्या वतीने दर आठवड्यात तीन दिवस लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. तीन दिवस लॉकडाऊन हा कोरोनाची साखळी तोडण्यासाठीचा खरच पर्याय ठरू शकतो का याचा विचार होण्याची आवश्यकता आहे. कारण लॉकडाऊनच्या आधी व नंतरच्या दिवशी बाजारात होणारी गर्दी मती गुंग करणारी ठरते. त्याचबरोबर दुकाने बंद ठेवल्याने व्यापा-यांचे होणारे आर्थिक नुकसान मोठे आहे. हातावर पोट असणारे,रोजंदारी करून उदरनिर्वाह करणारे हातमजूर,कष्टकरी यांच्या समस्या कोण जाणणार आहे की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे. दुकाने बंद ठेवली तरी मजूरांचा पगार,व्यापा-यांची,बॅंकेची देणी टाळता येत नाही. दुकानदारांसमोर हा चिंतेचा विषय आहे. याचाही विचार व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काय असू शकेल पर्याय
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव कमी व्हावा ही सर्वांचीच मनापासून इच्छा आहे. त्यासाठी प्रशासनाने राबविलेल्या उपायांना सर्वांनी सहकार्य केले आहेच. पण आता आर्थिक नुकसानीचा विचार करून उपाय योजना ठरवायला काहीच हरकत नाही. आठवड्यात तीन दिवस लॉकडाऊन करण्यापेक्षा एकच दिवस कडकडीत लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यु पाळण्यात यावा. दररोज सायंकाळी दुकाने बंद करण्याची वेळ ७ ऐवजी थोडी कमी केली तरी चालेल पण आता लॉकडाऊन नको अशी भावना व्यापा-यांमध्ये व्यक्त केली जात आहे. याचा प्रशासनाने नक्कीच विचार करावा अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
No comments
Post a Comment