विनाकारण फिरणारे जैसे थे,कारवाईचा धाक नाही, नियमांचे पालन न करणा-यांवर पोलीस कारवाईची अपेक्षा
-----------------------------------------------------------
अमळनेर - येथील उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी जाहीर केलेला दि. २७ ते २९ मार्च पर्यंतचा लॉक डाऊन जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार दि. ३० मार्च पर्यंत वाढविण्यात आला आहे. यामुळे अमळनेर शहर एकूण ४ दिवस बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांपासून अमळनेर शहरातील सर्व दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता बंद आहेत.पण काही दुकानदार छुप्या पद्धतीने आपली दुकाने सुरू ठेवत असल्याने नियमांचे बिनधास्तपणे उल्लंघन होत आहे. तर नियमांचे उल्लंघन करणा-या काही जणांवर नपाने दंडात्मक कारवाई केली आहे.
प्रशासनाने जारी केलेल्या लॉकडाऊनला व्यापारी बांधव व नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. मागील दोन दिवसांपासून बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे. नियमांचे पालन करत असलेले व्यापारी,व्यावसायिक,छोटे दुकानदार गुपचूप घरी बसले आहेत. ते प्रशासनाच्या सोबत आहेत. पण नियमांचे उल्लंघन करून छुप्या पद्धतीने आपली दुकाने सुरू ठेवणा-या मंडळीवर प्रशासनाने कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
नियमांचे उल्लंघन आणि पोलीसांचा धाक
त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या कालावधीत काही मंडळी विनाकारण गावात फिरत असल्याचेही दिसून येते. त्यांना पोलीसांचा धाक वाटतो की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. मागील काळात पोलीस निरीक्षक अंबादास मोरे असतांना लॉकडाऊनच्या दरम्यान शहरातील प्रमुख मार्ग व चौकात पोलीसांचा बंदोबस्त लावण्यात येत होता. त्यामुळे या रिकामटेकड्या समाजकंटकाना आळा बसला होता. जनता कर्फ्यु यशस्वी होण्यास हातभार लागत होता. आता या पोलीस निरीक्षकांच्या काळातही अशीच कठोर होईल अशी सूज्ञ नागरिकांना अपेक्षा होती. पण तसे होतांना दिसत नाही. तरी प्रशासनाने याबाबत कार्यवाही करावी अशी अपेक्षा जबाबदार नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

नपाची दंडात्मक कारवाई
दररोज सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर दर आठवड्यात असलेल्या लॉकडाऊन व जनता कर्फ्यु या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणा-यांवर नपाने कारवाई केली आहे. शहरात नियमांचे पालन न करणारे दुकाने,व्यापारी,मंगल कार्यालय, विना मास्क फिरणारे यांच्यावर नपाच्या अतिक्रमण पथकाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी आपल्या पथकासह व पोलीस प्रशासनाच्या मदतीने दि.२२ मार्च पासून ते आजपावेतो सुमारे १५० जणांवर दंडात्मक कारवाई केली असून एकूण १ लाख ८५ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. सदर कारवाई यापुढेही सुरू राहील असे राधेश्याम अग्रवाल यांनी आमच्या उपसंपादक रोहीत बठेजा यांना बोलतांना सांगितले.
No comments
Post a Comment