दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेबाबत अमळनेर हेडलाइन्सनेही दिले होते वृत्त
-----------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------
अमळनेर - महाराष्ट्र शासनाने नुकत्याच घोषित केलेल्या नवीन नियमावलीत काही दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे तर काही दुकानांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सर्व राज्यातील व्यापारी बांधवात नाराजीचा सूर उमटत आहे. सदर निर्णय मागे घेण्यात यावा या मागणीचे निवेदन आज अमळनेर व्यापारी असोसिएशनने उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांना दिले आहे.काही व्यवसायांना लॉकडाऊन
राज्य शासनाने नुकत्याच जारी केलेल्या निर्देशानुसार काही व्यवसायांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत घेऊन त्या दुकानांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. तर कापड दुकाने,भांड्यांची दुकाने,जनरल स्टोअर्स,
इलेक्ट्रॉनिक,इलेक्ट्रीकल्स आदी विविध व्यवसायाच्या दुकानांना उघडण्यावर बंदी घातली आहे. वास्तविक पाहता मागील काळात झालेल्या लॉकडाऊनमध्ये हे सर्वच व्यवसाय बंद होते त्यामुळे व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले आहे. यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असतांनाच शासनाने पुन्हा मिनी लॉकडाऊन लागू केला आहे.
सर्वांना परवानगी द्या - वेळेचे निर्बंध लावा
शासनाने सर्वच व्यापा-यांना दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. काही नियम लावायचे असतील तर दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अशी निश्चित करावी अशीही मागणी करण्यात आली असून आठवड्यात वीकेंड लॉकडाऊनच्या नियमांप्रमाणे आम्ही दुकाने बंद ठेऊ असे नमूद करण्यात आले आहे. शासनाने याबाबत त्वरित योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली असून असे न झाल्यास दुकानदार व कामगार वर्ग आंदोलनाचा मार्ग स्विकारतील असा इशाराही व्यापारी असोसिएशनने दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी,आ.अनिल पाटील,नपाच्या मुख्याधिकारी,पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
अमळनेर हेडलाइन्सनेही दिले होते वृत्त
मागील काही आठवड्यात दोन दिवस लॉकडाऊन व तिसरा दिवस जनता कर्फ्युचा असे तीन दिवस बंदचे आदेश प्रशासनाने दिले होते. या निर्णयाबाबत देखील व्यापारी बांधवात नाराजी व्यक्त केली जात होती. मागील वर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच जनतेला आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले होते. आता कुठे व्यवसायाची परिस्थिती सुरळीत होत होती.अशा परिस्थितीत सलग तीन दिवस दुकाने बंद ठेवल्याने नुकसान मोठ्या प्रमाणावर होत होते. याबाबत व्यापारी वर्गाची भुमिका आम्ही एका बातमीत मांडली होती. लॉकडाऊन व जनता कर्फ्यु करून सलग तीन दिवस दुकाने बंद ठेवण्यापेक्षा दररोज दुकाने सुरू ठेवण्याची वेळ नक्की करावी व आठवड्यात एक दिवस जनता कर्फ्यु पाळण्यात यावा असा पर्याय सुचविला होता. त्याच आशयाचे निवेदन आज अमळनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने प्रशासनास देण्यात आले.
राज्य स्तरावरही झाली बैठक
संपूर्ण राज्यात व्यापारी बांधवानी व्यक्त केलेल्या कडक नाराजीमुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आज ऑनलाईन बैठक घेतली.यात या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यापारी संघटनांकडून दोन दिवसांची मुदत मागितली असून सर्व संमतीने योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे.
No comments
Post a Comment