कोरोनाग्रस्त महिलेच्या घरी चोरी करणारा आरोपी अटकेत जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाने काही मुद्देमालासह आरोपीस घेतले ताब्यात

Thursday, April 8, 2021

/ by Amalner Headlines
------------------------------------------------------------------
                - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------
जळगाव -
  कोरोनाच्या आजारावर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्या घरी चोरी करणा-या चोरट्याला जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. पोलीसांनी काही मुद्देमालही आरोपीकडून ताब्यात घेतला आहे. अमळनेर शहरातील धुळे रोडवरील आर.के.पटेल कंपनी परिसरात राहणा-या उद्योजक महिलेकडे दि.२ एप्रिल रोजी सदर घरफोडीचा प्रकार घडला होता.
अशी घडली घटना
           अमळनेर येथील खासगी रुग्णालयात कोरोनाशी संघर्ष करणा-या या महिलेचे घर दि.२  एप्रिल रोजी कुलुपबंद होते. घरातील इतर महिलांनाही कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून त्या महिला विलगीकरणासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. त्यामुळे सदर उद्योजक महिलेचे घर बंद होते. या बंद घराचा कडीकोंडा तोडून हॉल व बेडरुम मधील लोखंडी कपाटातून १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचे सोन्या - चांदीचे दागीने व रोख रक्कम चोरट्याने चोरुन नेण्याचा प्रकार घडला होता.
गुन्ह्याचा शिताफीने लावला तपास
            चोरीच्या या घटनेबाबत अमळनेर पोलिस स्टेशनला भाग ५  गु.र.न. १५९/२१ भा.दं.वि.४५४,४५७,३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याच्या तपासकामी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे,अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने घटनेचा समांतर तपास सुरु केला होता. तपासादरम्यान अमळनेर शहरातील शेख रफीक उर्फ काजल शेख रशीद (वय ३८) रा.जुन्या न.पा. हॉस्पीटलच्या बाजुला,बॉम्बे गल्ली अमळनेर व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. शेख रफीक उर्फ काजल शेख यास पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेत चौकशी केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या इतर तीन साथीदारांची नावे उघड झाली आहेत. या गुन्ह्यातील चोरी झालेल्या मुद्देमालापैकी ३८ हजार ५०० रुपये रोख व १४ हजार ४१० रुपये किमतीचे सोन्याचे दोन कानातील टॉप्स अटकेतील आरोपी शेख रफीक उर्फ काजल याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत.
शोध कार्यात यांनी घेतला सहभाग
            या गुन्ह्याच्या तपासकामी पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अश्रफ शेख, प्रविण मांडोळे, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रितम पाटील, दिपक शिंदे, परेश महाजन,नरेंद्र वारूळे, पो.हे.कॉ. इद्रीस पठाण, अशोक पाटील, मुरलीधर बारी, महिला पोलिस नाईक सविता परदेशी, अभिलाषा मनोरे आदींनी तपासात सहभाग घेतला.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines