---------------------------------------------------------------------
अमळनेर - शहरातून जाणा-या धुळे - चोपडा रस्त्यावरील सिंधी कॉलनी परिसरात गेले अनेक दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अक्षरशः अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. यामुळे ये -जा करणा-या नागरिकांना त्रास होत असून तात्काळ पथदिवे लावण्यात यावेत अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे.अंधारामुळे रहदारीस अडथळा
अमळनेर शहरातून जाणारा धुळे - चोपडा हा मार्ग खुपच रहदारीचा आहे. या रस्त्यावर चोपडा नाक्यापासून ते सिंधी कॉलनीपर्यंतच्या रस्त्यावर गेले अनेक दिवसांपासून पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. सिंधी कॉलनीतील रहिवासी याच रस्त्यावरून ये -जा करीत असतात. अपघाताच्या भितीने रात्रीच्या वेळी अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावे लागते. या भागातील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची व्यथा कोण ऐकणार❓असा प्रश्न निर्माण होत आहे.

पोल बदलले मात्र पथदिवे गायब
या रस्त्यावरील विजेचे पोल दुरूस्त करण्याचे व नवीन पोल लावण्याचे काम महावितरणच्या ठेकेदाराने केले असल्याचे समजते. पोल लावल्यानंतर तीन पोलवर पथदिवे लावण्यात आलेले नाहीत. या परिसरातील नागरिकांनी नपास वेळोवेळी विनंती केली पण अद्याप पावेतो पथदिवे लावण्यात आले नाहीत. नवीन पोल लावण्यात आले,तार टाकण्यात आली पण पथदिवे का लावले नाहीत हा प्रश्नच आहे.काही वेळा पथदिवे चोरी होण्याचे प्रकार देखील घडले असल्याचे बोलले जात आहे. येथील पथदिवे त्वरित लावण्यात यावेत अशी सुचना नगर परिषदेच्या वतीने महावितरणच्या संबंधित यंत्रणेस करण्यात आली असल्याची माहिती मिळाली असून आता तरी सदर पथदिवे लावण्याची कार्यवाही होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
No comments
Post a Comment