पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या कारवाईने अवैध धंदे करणा-यांचे धाबे दणाणले
वाळू उपश्याबाबत महसूल विभाग होता का अनभिज्ञ❓ - कारवाईत दिरंगाईचे कारण तरी काय❓
----------------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यातील जळोद येथील तापी नदी पात्रात दि. १३ मे रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक करत असलेल्या ठिकाणी अमळनेर पोलिसांनी छापा टाकून सात डंपर व एक जेसीबीसह अंदाजे ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर चालक मालकासह १३ जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अवैधरित्या वाळू उपसा करणा-यांवर अमळनेर पोलीसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. या कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ तर उडाली आहेच पण तालुक्यात अवैध धंदे करणा-यांचे धाबे दणाणले आहे. तसेच महसूल विभागाने या प्रकरणी कारवाई का केली नाही असाही प्रश्न निर्माण होत आहे.वाळू माफिया बिनधास्त
अमळनेर तालुक्यात बोरी,
तापी व पांझरा या नद्यांमधून प्रामुख्याने विविध ठिकाणी अवैध वाळू उपसा होत असतो.या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी व ग्रा.पं.नी वेळोवेळी याबाबतच्या तक्रारी प्रशासनाकडे दिल्या आहेत. पण छोट्या व्यावसायिकांवर तात्पुरती कारवाई होत असल्याचे बोलले जात आहे.अनेक मोठे वाळू माफिया मात्र बिनधास्तपणे वाळू वाहतूक करत असल्याचे दिसून येत आहे.
वाळू ठेका नाही - महसूल बुडाला
आता पोलीस प्रशासनाने अतिशय मोठी कारवाई करत अवैध व्यवसाय करणा-यांना एकप्रकारे इशारा दिला आहे. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. अवैध वाळू वाहतूक जोरात होत आहे आणि चार वेळा लिलाव काढून देखील अमळनेर तालुक्यातून एकही वाळू ठेका गेला नाही. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडाला आहे.याला जबाबदार कोण असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
अशी झाली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे व उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात रात्रीची गस्त घालत असतांना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे, रवींद्र पाटील, भूषण बाविस्कर, अमोल पाटील, योगेश महाजन, सूर्यकांत साळुंखे या पथकास तापी नदीत अनेक डंपर वाळू वाहतुकीसाठी उतरल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अचानक छापा टाकला असता तेथे सात डंपर व एक जेसीबी मशीन आढळून आले. इतर डंपर व ट्रॅक्टर तसेच जेसीबी मशीन पळवून लावण्यात काही लोक यशस्वी झाले.
यांचेवर झाली कारवाई
या कारवाईत १० लाख रुपये किमतीचे जेसीबी (एमएच१९/सीयु५७६५) चालक गोपाळ रवींद्र पाटील (नांद्री) व मालक अमोल रमेश पाटील (अमळगाव), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/एम४६८५), चालक व मालक विक्की सतीश ललवाणी, ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच १९/झेड- १९७०) चालक व मालक दीपक शालीक पाटील (नांद्री), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/एम५९४९) चालक विनोद महादू निकम (शिरुडनाका) व मालक किशोर बापू पाटील (विवेकानंद नगर), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/बीजी७०३१) चालक दिनेश नागो पाटील (बुधगाव, ता. चोपडा) व मालक अरुण पुंडलिक पाटील (रवीनगर), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/बीए २९०), चालक संतोष हिरामण जावळे (वाघोदा) व मालक अरुण पुंडलिक पाटील, ५ लाख रुपये किमतीचे डंपर (जीजे ०१ डीझेड७५०)वरील चालक दिलीप आत्माराम पाटील (वाघोदे) व मालक सुरेश देविदास वाल्डे, ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच०४/डीडी२१३६) चालक पप्पू शांताराम शिंगाणे (भोईवाडा), मालक भूषण आत्माराम बडगुजर यांच्यावर अवैध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याजवळील ३६ हजार रुपयांची वाळू असा एकूण ४५ लाख ३६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
यांनी काढला पळ
आण्णा उर्फ अर्जुन वासुदेव कोळी (जळोद) यांच्या मालकीचे एक जेसीबी, ४ ट्रॅक्टर व १ डंपर नदी पात्रातून पळून गेले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहेत.
महसूलची कारवाईत दिरंगाई का❓
अमळनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा कुठे होत असतो याबाबतची माहिती प्रशासनाला निश्चितच मिळत असेल. मग एवढ्या मोठ्या वाळू उपसा व वाहतूकीवर महसूल विभागाने कारवाई का केली नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल तर बुडतोच पण पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. मग महसूल विभाग कारवाईत दिरंगाई व दुर्लक्ष का करत आहे. आता महसूल विभागानेही कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
No comments
Post a Comment