-------------------------------------------------------------------
अमळनेर- तालुक्यातील रुग्ण संख्या बऱ्याच प्रमाणात नियंत्रित झाली असून मृत्यूला रोखण्यात यश आले असले तरी नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी हुरळून न जाता शासन नियमांचे पालन करायचे आहेच. तिसरी लाट तालुक्यात येणार नाही आणि आपली मुले सुरक्षित राहतील याची दक्षता घ्या असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे. तालुक्यात कोरोनाने उच्चांक गाठला होता. बेड,ऑक्सिजन मिळत नव्हते,मृत्यूचे प्रमाण वाढले होते अशा वेळी सर्वांनी सहकार्य करत मदतीला तर धावले मात्र हिंदू ,मुस्लिम,बौद्ध अशा सर्व धर्म,जातीच्या सणांना नियमांचे पालन करून गर्दी करणे टाळले,प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर,परिचारिका,शिक्षक, आरोग्य सेवक यांनी जोखीम स्वीकारून चाचण्या वाढवल्या , गल्लोगल्ली सर्वेक्षण केले , पालिका आणि पोलिसांनी वेळप्रसंगी कठोर कारवाई केली. यामुळेच कोरोना पॉझिटिव्हीटी एक टक्क्यांच्या खाली आली आहे. रेमडेसीवर इंजेक्शनचा अनावश्यक वापर टाळून योग्य त्या इंजेक्शनचा गरज असेल तरच वापर करण्याचे आवाहन केल्यामुळे मृत्यू प्रमाण शून्यावर येऊन फंगल इन्फेक्शनचे रुग्णही कमी झाले. ज्यांना झाले आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र आता तिसऱ्या लाटेची शक्यता बळावली आहे. त्यामुळे लोकांनी दक्षता बाळगण्याची आवश्यकता आहे. शासनाच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टनसिंग,मास्क,सॅनिटायझर किंवा हात धुणे यासह लसीकरण या चार सूत्रांची अंमलबजावणी सुरूच ठेवावी. तसेच विशेष काळजी लहान मुलांची घ्यायची असून त्यांना बाहेर न जाऊ देणे , समारंभ,लग्न,साखरपुडा,अंत्ययात्रा अशा ठिकाणी लहान मुलांना नेऊ नये आवश्यकता असेल तरच जावे. बाहेर गावाहून येणाऱ्या नातेवाईकांबाबत बेसावधपणा करून चालणार नाही. त्यांच्या संपर्कात लगेच न येता आधी त्यांची चाचणी करून घ्यावी , गरज नसतांना प्रवास टाळावेत असेही आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.
No comments
Post a Comment