फरशी रोड,पैलाड,ताडेपुरा भागात बौद्ध पूजन व खीर वाटप
------------------------------------------------------------------
अमळनेर - शहरात काल बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात व कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करीत साजरी करण्यात आली. दरवर्षी बौद्ध पौर्णिमेनिमित्त मोठे कार्यक्रम प्रत्येक भागात होत असतात. मात्र गेल्या वर्षापासून बौद्ध पौर्णिमेसह विविध सणांवर कोरोनाचे सावट आहे. अमळनेर तालुक्यातील बौद्ध बांधवांनी प्रत्येक सण,उत्सव कोरोना बाबतची दक्षता घेऊनच साजरे केले आहेत. शहरातील फरशी रोड भागात नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांच्या प्रतिनिधित्वाने संध्याकाळी बौद्ध पूजा व १०० लिटर दुधाची खीर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अनेक बौद्ध बांधव उपस्थित होते.
तसेच पैलाड भागात असलेल्या बौद्ध विहार येथे गजरे परिवार व परिसरातील नागरिकांनी बौद्ध पूजा व खीर वाटप आयोजित केले होते. यावेळी रवींद्र गजरे व त्यांच्या पत्नी इंदूबाई गजरे यांच्या हस्ते सर्व विधी झाला. नंतर या दाम्पत्याच्या हस्ते खीर वाटपही करण्यात आली. यावेळी आयोजकांनी कोरोना बाबत त्रिसूत्रीचे पालन करत कार्यक्रम घडवून आणला.
ताडेपुरा भागातील साई - गजानन नगरमध्येही मोठ्या उत्साहात तरुणांनी कार्यक्रम आयोजित केला होता. येथेही बौद्ध पूजा व खीर वाटप करण्यात आले.
फरशी रोड व पैलाड भागात भन्ते सिद्धार्थ सोनवणे तसेच ताडेपुरा भागात कैलास बिऱ्हाडे यांनी विधी केला.

