----------------------------------------------------------------------
अमळनेर - राज्य शासनाने घोषित केलेल्या 'ब्रेक द चेन' च्या यशस्वीतेसाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. आज अमळनेर शहरात पोलीसांनी नियमांचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई केली.विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. या कारवाईने नियम मोडणा-यांमध्ये कायद्याचा वचक निर्माण झाला आहे.
प्रामुख्याने करण्यात आलेली कारवाई
आज १०२ व्यक्तींची एंटीजेन टेस्ट केली असता ०४ व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आल्या आहेत,तर विना मास्क फिरणा-या २९ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे, ०१ व्यक्तींवर ३५० रुपये दंड तर ०१ व्यक्तींवर २०० रुपये दंड असा एकूण १५,०५०/- रुपये दंड वसुल करण्यात आला, M act प्रमाणे ५४ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे १०,८००/- रुपये दंडाची रक्कम वसुल करण्यात आली, विना हेल्मेट वाहनावर फिरणा-या ४८ व्यक्तींवर ऑनलाईन पध्दतीने कारवाई करण्यात आली आहे, हातगाडी घेऊन फिरणा-या २० व्यक्तींवर २००/- रुपये प्रमाणे ४०००/- दंड करण्यात आला आहे, संचार बंदीचे उल्लंघन करून विना कारण फिरणारे ८ व्यक्तींवर १००० रुपये प्रमाणे ८०००/- रूपये आणि १५ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे ३०००/- रूपये असा एकूण ११,०००/- रूपये दंड वसुल करण्यात आला आहे. अशाप्रकारे आज १७६ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून एकूण ४०,८५०/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

काही मिनिटातच बाजार बंद
दररोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आज ११ वाजता उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे,उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव,तहसिलदार मिलिंदकुमार वाघ,नपाच्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक गंभीर शिंदे पालिकेचे संजय चौधरी, राध्येश्याम अग्रवाल यांनी पोलीस व नपा कर्मचारी वर्गासह बाजारपेठेत फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. अधिकारी व कर्मचारी यांचे एकत्रित पथक बाजारात पोहोचताच काही मिनिटातच बाजारपेठ बंद झाल्याचे दिसून आले.
पोलीस उतरले रस्त्यावर
त्यानंतर शहरातील प्रमुख चौकात थांबून पोलीसांनी विनाकारण गावात फिरणारे व नियमांचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई केली. तर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी आपल्या पोलिस पथकासह बाजारपेठ परिसरात फिरून नागरिकांना आवाहन केले. नव्यानेच बदलून आलेल्या पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी बाजारपेठ व शहरातील प्रमुख चौकात केलेल्या कडक कारवाईमुळे विनाकारण गावभर फिरणा-यांमध्ये वचक निर्माण होत असल्याचे दिसून आले.
No comments
Post a Comment