काही ठिकाणी धाडसत्र,तरीही अवैध धंद्यांना आळा घालण्याचे पोलीसांसमोर आव्हान
..........................................................
अमळनेर - कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने राज्यात सध्या अनेक निर्बंध जाहीर केले आहेत. या निर्बंधांच्या परिस्थितीतही अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावल्याचे चित्र दिसत आहे. शहर व तालुक्यातील काही ठिकाणी पोलीसांनी अवैध धंद्यांवर मागील आठवड्यात छापे टाकले. पण त्यानंतर अजूनही सट्टा,मटका,दारू,जुगार,गुटखा यासारखे अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. या धंद्यांना आशिर्वाद कुणाचा हा प्रश्न निर्माण होत असून राजरोसपणे चालणा-या धंद्याला आळा घालण्याचे आव्हान पोलीसांसमोर आहे.अवैध गुटखा विक्रीचे आव्हान
अमळनेर शहर व तालुक्यात मागील काही महिन्यात अवैध गुटखा व दारू व्यवसायांवर छापे टाकले होते. यावेळी गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. लॉकडाऊनच्या काळातही हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असल्याची चर्चा आहे.येथे शेजारील तालुक्यातून गुटखा विक्रीस आणला जात असल्याची चर्चा आहे.अक्षरशः लाखो रूपयांची उलाढाल या धंद्यात होत असल्याचे बोलले जात आहे.
दारू,मटका,जुगारही बिनधास्त❓
अवैध दारू विक्री आणि मटका,जुगार व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे नुकत्याच काही ठिकाणी पडलेल्या धाडसत्रावरून दिसून आले आहे. लॉकडाऊनमुळे सामान्य माणसाच्या रोजगार व उत्पन्नाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असतांनाही या धंद्यात होत असलेली उलाढालही विचार करायला भाग पाडणारी आहे. पोलीसांनी छाप्यात मुद्देमालासह काही साहित्य व रोख रक्कमही जप्त केली आहे. त्यानंतरही हे व्यवसाय जागा बदलून पुन्हा सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
सट्टा व मटक्याप्रमाणेच पत्ते,ऑनलाइन जुगार या अवैध व्यवसायांनी ग्रामीण भागातही आपले पाय रोवले आहेत. अनेक युवक आर्थिक आमिषाला बळी पडून या अवैध दुष्टचक्रात अडकत आहेत. सध्याच्या परिस्थितीत तर हे आर्थिक दुष्टचक्र अधिकच बिकट बनत असल्याचे दिसून येत आहे.
शहरी व ग्रामीण भागात या अवैध व्यवसायांमुळे युवक वर्ग व सामान्य कुटुंबातील व्यसनाधिनता हा देखील मोठा सामाजिक प्रश्न बनला आहे. या अवैध व्यवसायांना आळा घालणे सामाजिकदृष्ट्या आवश्यक बनलेले आहे. शासनाचे कठोर निर्बंध असतांना अवैध व्यवसाय चालतातच कसे हा सामान्य नागरिकांना पडलेला अनुत्तरीत प्रश्न आहे. या धंद्यांना अभय कुणाचे या विषयावरून मागील पंधरवाडयात राजकीय नेतृत्वात रंगलेला कलगीतुरा जनतेने अनुभवला आहेच.
या व्यवसायांना रोखणे हे पोलीस यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे. मागील आठवड्यात पडलेल्या धाडसत्रावरून प्रशासनाची कार्यक्षमता व इच्छाशक्ती दिसून आली आहे. राजकीय नेतृत्वानेही प्रशासनाच्या पाठीशी आपले पाठबळ उभे केल्यास अवैध धंदे भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.
No comments
Post a Comment