धोका टाळायचा आहे तर नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता
-----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------
अमळनेर - डेल्टा प्लस आजाराचे रूग्ण आढळून आल्यामुळे प्रशासनाने नवीन निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार दुपारी चार वाजेनंतर दुकाने बंद ठेवावेत व दिवसा सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण संचारबंदी व जमावबंदीच्या आदेशास नागरिकांनी ठेंगा दाखविल्याचे चित्र बाजारात दिसून आले. निर्धारित वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवणा-या चार दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आजाराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे असे जाणकारांचे मत आहे.या नियमांचे कडक पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले होते. सोमवार पासून या नियमांचे पालन करण्याचे आदेश असतांना पहिल्या दिवशी अंमलबजावणी मात्र संमिश्र प्रमाणात दिसून आली. बाजारात वेळेनंतरही अनेक दुकाने सुरू होती. नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. प्रशासनाचे निर्बंध नागरिकांनी अक्षरशः धुडकावून लावल्याचे चित्र दिसत होते. पोलीस व नपाचे कर्मचारी दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते. पण दुकानदार व नागरिकांवर काहीही फरक पडत नव्हता. कोणतेही निर्बंध नसल्यासारखी सामान्य स्थिती आहे की काय असे वाटत होते.

मंगळवारी प्रशासन सख्त
निर्बंधांच्या दुस-या दिवशी मंगळवारी प्रशासन कठोर झाल्याचे दिसून आले. चार वाजेनंतर पालिका कर्मचारी व पोलीस बंदचे आवाहन करीत होते. हातगाडीवर व्यवसाय करणारे, किरकोळ दुकानदार,व्यापारी यांनी आजही नियम झुगारून लावले होते. तर बाजारपेठ,भाजी बाजार, भागवत रोड,सिंधी बाजार,कुंटे रोड या भागातील दुकाने सुरू होती. बहुतेकांनी मास्क लावलेले नव्हते. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सींग,जमावबंदीचे पालन याकडे साफ दुर्लक्ष झाले होते. तर दुपारी ४ वाजेनंतर पोलीस व नपा कर्मचारी बाजारातून परत गेले की भाजीपाला विक्रेते पुन्हा आपली दुकाने थाटत असल्याचे चित्र दिसून आले. तसेच काही दुकानदार अर्धवट शटर उघडे ठेऊन मालाची विक्री करतांना दिसत होते.

चार दुकानांवर कारवाई
पण आज प्रशासन थोडे कडक झाल्याचे दिसून आले. नपाच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल आणि त्यांच्या पथकाने दुपारी ४ वाजेनंतर दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानंतरही दुकाने सुरू ठेवणा-या चार दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात जयवंत पवार,अनिल भोई,शिवशक्ती पावभाजी,रवि पाटील यांचा समावेश आहे. कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका टाळायचा असेल तर नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे मत जाणकार नागरिकांनी व्यक्त केले आहे.


