चोरी करून पळ काढणारे दोन आरोपी पोलीसांच्या तावडीत अमळनेर बस स्थानकातील घटना

Tuesday, July 13, 2021

/ by Amalner Headlines
---------------------------------------------------------------
                      - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------
अमळनेर - बसमध्ये चढणा-या प्रवाशाच्या खिशात हात घालून रक्कम घेऊन पळ काढणा-या दोन तरूणांना प्रवाशांच्या सहकार्याने ताब्यात घेण्यात अमळनेर पोलीसांना यश आले आहे. पोलीसांनी प्रसंगावधान राखून तात्काळ कार्यवाही केल्याने जळगाव येथे बकरी चोरीच्या घटनेत फरार असलेले व अमळनेर बस स्थानकात चोरी करणारे आरोपी हाती लागले आहेत.
दोन्ही आरोपी गजाआड
        याबाबतची अधिक माहिती अशी की,तालुक्यातील जवखेडे येथील दंगल सूरजन भिल हे आपल्या नातवासोबत अमळनेर येथे आधार कार्डचे काम करण्यासाठी आले होते. सदर काम करून ते बस स्थानकावर आले. ते जवखेडे येथे जाण्यासाठी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेऊन जुबेर शेख भिकन (वय १९,गेंदालाल मिल,जळगाव) व गौरव जगन कोळी (वय १९,शिवाजी नगर,जळगाव) या तरूणांनी त्यांच्या खिशातून जबरीने ५०० रुपये काढून पळ काढला. प्रवाशांनी आरडाओरड केल्याने ड्युटीवरील सहाय्यक फौजदार निंबा शिंदे यांनी नागरिकांच्या सहाय्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला हजर केले. सदर आरोपींविरूध्द दंगल सूरजन भिल यांनी तक्रार दाखल केल्याने  अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि.नं. ३०३/२०२१ नुसार भादंवि कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अलोक साबळे करीत आहे.
'फरारी' अटकेत
           वरील घटनेतील दोन्ही आरोपी हे जळगाव येथील बकरी चोरीच्या घटनेतील फरार  असल्याचे दिसून आले. या दोन्ही आरोपींविरुध्द याआधीच दि.११ जुलै २०२१ रोजी  जळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. सदर आरोपींना अमळनेर पोलीसांनी अटक केली आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines