-----------------------------------------------------------------
अमळनेर - शहरात मागील काही दिवसात चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेरचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या संकल्पनेतून जाहीर आवाहन करून जनतेला सुचित करण्यात आले आहे. रिक्षाच्या मागील बाजूस डिजीटल बॅनर लावून महत्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अमळनेर शहरात दररोज लहान - मोठ्या चो-या होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहने चोरी होणे, घरमालक गावाला गेला असल्याची संधी साधून घरातील ऐवजावर डल्ला मारणे यासारख्या घटना घडत आहेत. यामुळे अशा घटना घडणार नाहीत यादृष्टीने काय काळजी घ्यावी याबाबत जनजागृतीपर सुचना देणारे बॅनर रिक्षावर लावण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी या उपक्रमाद्वारे नागरिकांना विश्वासात घेत गुन्हे रोखण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. रिक्षावर डिजीटल बॅनर लावून या बॅनरची रिक्षा चालकांनी काळजी घ्यावी अशी विनंती केली आहे. यावेळी पोलीस नाईक डॉ.शरद पाटील, रिक्षा चालक - मालक व नागरिक उपस्थित होते.

नागरिकांसाठी काय आहेत सुचना
फेरीवाल्यांना करा विचारणा
कोणतीही मोठी चोरी करण्याआधी ते घर व परिसराची चोरट्यांकडून रेकी करण्यात येत असते. त्यामुळे आपल्या भागात किंवा कॉलनीत येणा-या फेरीवाल्यांनी आपली माहिती पोलीस स्टेशनला दिली आहे काय अशी त्यांना विचारणा करावी.
सेफ्टी डोअर बसवा
दिवसा घरास कुलूप असल्याचे पाहून चोरटे त्याठिकाणी रात्री चोर चोरी करत असतात. त्यामुळे घराला बाहेरून कुलूप लावलेले आहे की नाही हे समजू नये असे सेफ्टी डोअर बसवावे.
रोख रक्कम व दागिने लॉकरमध्ये ठेवा.....
नागरिकांनी बाहेरगावी जातांना रोख रक्कम व मौल्यवान दागिने बॅंकेत लॉकरमध्ये ठेवावेत.कारण चोरटे घरात प्रवेश केल्यावर आधी कपाट तोडतात.
.....अथवा सुरक्षित ठिकाणी ठेवा
जर दागिने व रोख रक्कम लॉकरमध्ये ठेवणे शक्य नसेल तर घरात चोरट्यांना सहज सापडणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावेत.
सीसीटीव्ही बसवा
नवीन कॉलनीतील नागरिकांनी मुख्य रस्त्यावर सामुहिक वर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. दुकाने व घरांच्या सुरक्षिततेसाठी मुख्य रस्त्यावर ५० मिटर भाग दोन्ही बाजूंनी येईल अशा पध्दतीने कॅमेरे लावावेत. अनुचित घटना घडल्यास या सीसीटीव्हीमुळे पोलीसांना तपासासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होऊ शकते. ज्या भागात कॅमेरे आहेत तेथे चोरी होण्याचे प्रमाण कमी आहे.तसेच वाहनेही सुरक्षित रहातात.

पथदिवे व लाईट सुरू ठेवा
मुख्य रस्ता,गल्ली अथवा कॉलनीतील पथदिवे बंद असल्याचा गैरफायदा चोरटे घेत असतात. त्यामुळे नपा किंवा ग्रामपंचायत यांच्यावर अवलंबून न रहाता आपल्या घराबाहेरील लाईट सुरू ठेवावेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेले पथदिवे सुरू असल्याची खात्री करावी.
अशा महत्वाच्या सुचना पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
No comments
Post a Comment