----------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------
अमळनेर - शहरातील सिंधी कॉलनी परिसरात सार्वजनिक ठिकाणी कच-याचे ढीग साचले आहेत. तर गल्ली बोळातही घाणीचे अक्षरशः साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यापूर्वीची साफसफाई करणे आवश्यक असतांना त्याकडे नपाने दुर्लक्ष केल्याने सिंधी कॉलनीत आता तर डेंग्यु आजाराच्या रूग्णासह इतर साथीच्या आजाराच्या रूग्ण संख्येत वाढ झाली आहे. अनेक रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत. नपा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन परिसराची साफसफाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
साथ रोग आजारात वाढ
सिंधी कॉलनीत विविध ठिकाणी साचलेला कचरा उचलणे व इतर साफसफाई होण्याबाबत नागरिकांनी अनेकदा संबंधितांना विनंती केली होती. पण त्यानंतरही योग्य कार्यवाही झाली नाही. पावसाळ्यात पाणी साचून डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे परिसरात साथीच्या आजाराच्या रूग्ण संख्येत वाढ झाली आहे. अनेक जण अद्यापही रूग्णालयात दाखल आहेत. काही जणांना तर डेंग्यु सदृश्य आजार झाला असल्याची माहिती आहे.

नपा प्रशासनाचे दुर्लक्ष
सिंधी कॉलनीतील नागरिकांनी संबंधितांना सदर ठिकाणी साफसफाई होण्याबाबत वेळोवेळी विनंती केली होती. पण प्रशासनाने या महत्त्वाच्या बाबींची दखल घेतली नसल्याची स्थानिक नागरिकांची भावना बनली आहे. यामुळेच साथीचे आजार व इतर आजार वाढीस लागले आहेत असे स्थानिक रहिवाशांचे मत झाले आहे. यामुळे नागरिकांना खुपच त्रास सहन करावा लागत आहे. आर्थिक व आरोग्य दोन्ही बाजूंनी नुकसान सहन करावे लागले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाला आर्थिक झळ सोसावी लागणे त्रासदायक होत आहे याचा विचार होऊन कार्यवाही होणे आवश्यक आहे.
नागरिकांची मागणी
नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्यासाठी नपा प्रशासनाने तातडीने या परिसरात स्वच्छता व साफसफाई अभियान राबवावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

