------------------------------------------------------------
अमळनेर - राज्यात कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीही गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना शासनातर्फे करण्यात आल्या आहेत.काय आहेत सुचना
१. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
२. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट
करतांना त्यात भपकेबाजपणा नसावा.
३. श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फूटांच्या मर्यादेत असावी.
४. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.
५. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
६. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.
७. लागू करण्यात आलेले level of restrictions for breking the chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार निर्बंध लागू रहातील. गणेशोत्सवानिमित्त त्यात कोणतीही शिथिलता देता येणार नाही.
८. आरती,भजन,किर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनिप्रदुषणाचे नियम व तरतुदींचे पालन करावे.
९. श्री गणेश दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क,
वेबसाईट,फेसबुक याद्वारे करून द्यावी.
१०. गणपती मंडपात येवून दर्शन करणा-यांसाठी निर्जंतुकीकरण,
मास्क,सोशल डिस्टंन्सींग,सॅनिटायजर यांची पर्याप्त प्रमाणात व्यवस्था करण्यात यावी व तसे नियमांचे पालन करण्यात यावे.
११. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.
१२. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था,लोक प्रतिनिधी,
स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमुर्तीच्या विसर्जनाकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
१३. कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.
तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध
करण्यात आली असून त्याचा सांकेतांक २०२१०६२९१३०८३६४७२९ असा आहे असे परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे.

