अमळनेर - नाश्ता करण्यासाठी गेलेल्या रस्त्यालगतच्या हातगाडीवर मोबाईल हरवल्याने उदास झालेल्या सुरजला अमळनेर पोलीसांनी अवघ्या सहा तासात मोबाईलचा तपास लावून सुखद धक्का दिला आहे. मोबाईल धारक सुरजने पोलीसांचे आभार मानले आहेत.
काम करून घेतलेला मोबाईल गायब
येथील सुरज शंकरलाल बठेजा हा महाविद्यालयीन युवक दि.१४ ऑगस्ट रोजी सायंकाळी शहरात रस्त्यालगत असलेल्या हातगाडीवर नाश्ता करण्यासाठी गेला असता त्या दरम्यान त्याचा मोबाईल हरवला असल्याचे दिसून आले. सदर तरूण महाविद्यालयात शिकत असून ऑनलाईन क्लाससाठी आवश्यक असलेला मोबाईल त्याने एका कापड दुकानात नोकरी करून घेतला आहे. काही दिवसांपूर्वी घेतलेला मोबाईल हरवल्याने सुरज खुपच निराश झाला होता.काही वेळ शोध घेतल्यावर मोबाईल न मिळाल्याने त्याने पोलीसात धाव घेतली.
तातडीने लागला तपास
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. भरत श्रीराम ईशी यांनी तातडीने मोबाईलचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि अवघ्या सहा तासात मोबाईलचा तपास लागला. मोबाईल मिळाल्याची माहिती मिळाली तेव्हा कुठे त्याला समाधान वाटले. त्याला खुपच आनंद झाला.
पोलीसांचे मानले आभार
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.भरत ईशी यांनी तातडीने दखल घेतली व कार्यवाही केल्याने मोबाईल परत मिळाला असल्याने सुरज बठेजा याने पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.

