अमळनेर - येथील पोलीस स्टेशन मधील गोपनीय शाखेचे पोलीस नाईक डाॅ.शरद पाटील यांना एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने रस्त्यावर अडवून मारहाण केली. या घटनेने खळबळ उडाली असून या घटनेचा जनतेतून निषेध व्यक्त केला जात आहे.
काय आहे घटना
याबाबतची अधिक माहिती अशी की,अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक डॉ.शरद तुकाराम पाटील हे कर्तव्यावर असतांना बस स्थानका समोरील भागवत रोड येथे रितेश उर्फ टिनु अरुण बोरसे नामक रेकॉर्ड वरील गुन्हेगाराने त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना 'मी तक्रार मागे घेतो मला ५० हजार रुपये दे' अशी मागणी केली. पो.ना.पाटील यांनी नकार दिला असता रितेश उर्फ टिनू बोरसे याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.चापटांनी मारहाण केली व शर्टाचे बटन तोडले. तसेच शिवीगाळ केली. यावेळी त्याठिकाणी उपस्थित काही व्यक्तींनी त्यांना सोडवले.

त्यानंतर टिनू शिवीगाळ करत तेथून निघून गेला. त्यानंतर श्री शरद पाटील यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. सहा.पो.नि. राकेशसिंग परदेशी यांनी पोलीस कर्मचारी घटनास्थळी पाठवले. घटनेबाबत शरद पाटील यांनी पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दिली आहे.
आरोपीविरूध्द या पूर्वीही दाखल आहेत गुन्हे
या आधीही रितेश उर्फ टिनू बोरसे याच्या विरूध्द अमळनेर पोलीस स्टेशनला भाग-५ चे एकूण ०७ गुन्हे तर भाग-६ चे एकूण ०८ गुन्हे दाखल आहेत. आज घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पो.ना.डॉ. शरद पाटील यांचेवर डॉ. संदीप जोशी यांच्या रूग्णालयात उपचार करण्यात आले.
कारवाईची मागणी
पोलीस कर्मचा-यास मारहाण करणे व शासकीय कामात अडथळा आणणा-या या इसमाचा जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यावर कोणी हल्ला करत असेल तर तालुक्यातील जनतेचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होईल व जनता भयभीत वातावरणात घराच्या बाहेर पडण्यास धजावणार नाही म्हणून खंडणीखोर भ्याड हल्लेखोरास ताबडतोब अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
No comments
Post a Comment