------------------------------------------------------------
अमळनेर - शहराची सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळख असलेला येथील प्राचीन दगडी दरवाजाचा उर्वरित भाग काल रात्री पुन्हा कोसळला. या बाबत तातडीने चार दिवसात दुरूस्ती कामास सुरूवात करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे दि. २४ जुलै २०१९ रोजी दगडी दरवाजाचा उजव्या बाजूचा बुरुज ढासळला. त्या दिवसापासून ते आजपावेतो प्रशासन जणू दगडी दरवाजा पडण्याचीच वाट पाहत आहे अशी भावना जनमानसात निर्माण झाली आहे. ऑगस्ट २०२० पासून कार्यारंभ आदेश देवून देखील आजपर्यंत कामात कोणतीही प्रगती दिसत नाही.
काम करा अन्यथा आंदोलन
आज दि.२ सप्टेंबर २०२१ रोजी दगडी दरवाजा पुनर्निर्माण समितीने नपाचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची भेट घेत काल दि. १ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता काही भाग पुन्हा ढासळल्याच्या पार्श्वभूमीवर निवेदन देऊन चर्चा केली. काम तात्काळ सुरू करावे अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले. संबंधित ठेकेदारास शक्य नसल्यामुळे काम संथगतीने सुरू आहे म्हणून ठेकेदार बदलवून काम तात्काळ सुरू करावे. अशी देखील मागणी करत येत्या चार दिवसात जर जलद गतीने काम सुरू झाले नाही तर तीव्र उग्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन समितीच्या वतीने दिलेले आहे. निवेदनावर पंकज चौधरी,गोपी कासार, नाविद शेख, बाळासाहेब संदानशिव यांच्या स्वाक्ष-या आहेत.
मुख्याधिका-यांनी दिले आश्वासन
तात्काळ दखल घेऊन काम त्वरित सुरू होईल असे आश्वासन मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे यांनी समितीच्या सदस्यांना दिले आहे.
No comments
Post a Comment